केरळ भाज्यांनाही देणार किमान हमी भाव


तिरुअनंतपुरम: भाज्यांना किमान हमी भाव देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. राज्य सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून लागू केलेल्या योजनेनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या भाज्यांना निश्चित दर मिळणार असून बाजारात भाव पडल्यास राज्य सरकार हमी भावाने भाज्या खरेदी करणार आहे.

देशभरात शेतकरी संकटात आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले. मागील साडेचार वर्षात आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्र शासनाकडून धान्य, कडधान्य, नगदी पिके यांना हमी भाव दिला जातो. मात्र, भाज्यांना हमी भाव देणारे केरळ हे पहिले राज्य ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्याने १६ भाज्यांचा समावेश या योजनेत केला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याच ठिकाणी भाज्या लागवडीचे क्षेत्र आणि प्रकार, तयार होण्याचा कालावधी याची माहिती द्यावी लागणार आहे. किमान हमी भावापेक्षा भाज्यांचे बाजारपेठेतील दर पडल्यास त्याची खरेदी राज्य शासन करेल. त्यासाठीं समन्वयक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे.