शेतकर्‍यांचे शत्रू किती?


भारतातल्या शेतकर्‍यांनी व्यावसायिक नीती स्वीकारली तर त्यांचा विकास होणे अवघड नाही. कारण आपला उद्धार आपल्याशिवाय कोणीही करू शकत नाही. सरकार, नेते, पुढारी किंवा देवाचा अवतार हे येऊन आपला उद्धार करणार आहेत, अशी काही भावना आपण बाळगणार असू तर आपल्याला देवाशिवाय कोणी वाचवू शकणार नाही. ‘‘जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग नासला’’ अशी एक उक्ती मराठी भाषेत आहे तशीच अवस्था शेतकर्‍यांची झालेली आहे. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतो, हे त्यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे. राजकीय पक्षांचे पुढारी तसे प्रामाणिकपणे सांगत नाहीत. कारण शेतकर्‍यांचे भले आपणच करणार आहोत, असा भास निर्माण करून त्यांना शेतकर्‍यांची मते हवी असतात. ही एक प्रकारची ङ्गसवणूक आहे. हे पुढार्‍यांना कळते, मात्र शेतकर्‍यांना कळत नाही हे दुर्दैव आहे. दोन वर्षापूर्वी भारतामध्ये शेतकर्‍यांची कर्जमाङ्गी केली गेली. कर्जमाङ्गी आवश्यक होती. कारण वर्षानुवर्षे हा व्यवसाय अशास्त्रीय पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे त्याला आर्थिक दिलासा देण्यासाठी कर्जमाङ्गीची गरज होती. परंतु कर्जमाङ्गीच्या घोषणा करताना नेत्यांकडून ज्या प्रकारचे दावे करण्यात आले, ते पाहिले असता यात ङ्गसवणूक कशी होते हे लक्षात येते.

कर्जमाङ्गी केल्याने शेतकर्‍यांचे भले होणार आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवे पर्व सुरू होणार, अशा प्रकारच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. त्यांचे काय झाले, याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, शेतकर्‍यांच्या आयुष्यात नवे पर्व सुरू व्हावे म्हणून हा उपद्व्याप केलेला नव्हता तर त्यांच्या राजकारणात नवे पर्व सुरू व्हावे यासाठी तो होता. एकंदरीत कर्जमाङ्गी होऊन सुद्धा शेतकरी आहे त्याच ठिकाणी राहिला आहे. आपण वारंवार व्यावसायिकता हा शब्द वापरत आहोत तो वापरण्यामागे काही उद्देश आहे. आपण शेती करतो, परंतु परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाच्या आधारावरच ती करत असतो. दरम्यानच्या काळात अनेक नवी संशोधने झालेली आहेत. त्यांची आपल्याला काही कल्पनाच नसते. त्यामुळे मागच्या पानावरून पुढे सुरू या क्रमाने आपला व्यवसाय आपण करत असतो. तेव्हा ही परंपराप्रियता सोडून आपण जगात काय चालले आहे याचा थोडासा कानोसा घेतला पाहिजे.

आपल्या शेती व्यवसायामध्ये आपण तज्ञांची मदत कधीच घेत नाही. शेती तज्ञ म्हणजे असतो कोण ? याचीच आपण कधी दखल घेत नसतो. खरे म्हणजे शेतामध्ये माती, पाणी, वारा, ऊन, बी, खते असे किती तरी घटक गुंतलेले असतात आणि त्यामध्ये सातत्याने संशोधन सुरू असते. त्या संशोधनामधून जुन्या समस्या सोडवलेल्या असतात, उत्पादन वाढ करण्याचे उपाय निघालेले असतात. मात्र आपण त्यांच्याशी कधी चर्चाच करत नाही. त्यामुळे जग बदलले तरी आपण मात्र आहोत तिथेच राहतो. एक लक्षात ठेवा की, जगाच्या बरोबर रहायचे असेल तर पळत राहिले पाहिजे. चालत राहिलात किंवा एके ठिकाणी थांबलात तर संपणार आहात आणि तुमच्या डोळ्यादेखत जग पुढे गेलेले असेल. शेतकरी हा असंघटित वर्ग आहे.वर्गाला कोणी वाली नाही. तसे अनेक लोक शेतकर्‍यांचे वाली असल्याचे दावे करतात पण प्रत्यक्षात ते शेतकर्‍यांचा अवसानघातच करतात. शेवटी शेतकर्‍यांना आपला लढा स्वत:लाच लढावा लागतो. तो लढा सोपा नाही. तो केवळ मोर्चे काढून आणि घेराव करून लढता येणार नाही. तो वैचारिक पातळीवर लढावा लागेल. त्यात आपल्याला काही युक्तिवाद करावे लागतील. आपल्याला काही सयुक्तिक प्रतिपादन करावे लागेल. यात शेतकरी कमी पडतो.

मध्यंतरी धान्याचा मद्यार्क तयार करण्यावरून महाराष्ट्रात महामूर वाद झाला. आता धान्याची दारू तयार होणार आणि ती दारू पिऊन हा शेतकरीच झिंगणार अशी काही विचारवंतांनी हाकाटी सुरू केली. या हाकाटीत किती तरी अज्ञान लपलेले होते. या कथित विचारवंतांना काही मूलभूत माहितीही नव्हती. त्यांंचे घोर अज्ञान, शेतकर्‍यांविषयीची तुच्छता आणि अनास्था तसेच अनेक गैरसमज त्यातून दिसत होते. त्यांनी शेतकर्‍यांच्या हिताच्या विरोधात अनेक विधाने धडाधड केली. ती तशी असूनही महाराष्ट्रात त्यांचीच वाहवा झाली पण या सार्‍या गदारोळात शेतकर्‍यांची बाजू कोणीच मांडली नाही. याबाबत शेतकरी कमी पडतात. शेतकरी अभ्यासू असला पाहिजे पण तो तसा नसल्याने त्याची बाजू जनतेच्या समोर कधी येतच नाही. ती खरी असून मागे राहते आणि खोट्यांचा मात्र बोलबाला होत रहातो. शेतकर्‍यांच्या विरोधात एक लेख आला की शेतकर्‍यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे. अनेकदा दूध दरवाढ झाली, भाज्या महागल्या किंवा कापसाच्या हमी भावाचा काही प्रश्‍न समोर आला की ग्राहकांची बाजू लगेच मांडण्यात येते. सरकारी कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू झाला किंवा महागाई भत्त्याचा एक हप्ता वाढला की मात्र असा वादही होत नाही आणि कोणी चिंताही व्यक्त करीत नाही. सिनेमा आणि नाटकाची तिकिटे १० रुपयावरून २०० रुपयावर गेली पण ती वाढत गेली याची कधी साधी बातमीही छापून आली नाही आणि कोणी आरडा ओरडाही केला नाही.

कांदा महागला की मात्र लगेच संपादक लेखणी सरसावतात आणि आपल्या शैलीदार शब्दात, कांद्याने गृहिणींच्या डोळ्यात किती पाणी येत असते याचे वर्णन करायला लागतात. याच वेळी कांदा कोसळला म्हणून शेतकर्‍याच्या डोळयाला कशा धारा लागतात याची काही खंत त्यांना नसते. साखर तर एखाद्या रुपयाने महागली की याच संपादकांच्या लेखण्यांची वाघनखे होतात आणि ती नखे सरकारला ओरबाडून काढायला लागतात. त्यांना साखर कडू वाटायला लागते. पण आपला एखादाही शेतकरी उठून ही साखर स्वस्त झाल्याने ती शेतकर्‍यांना कशी कडू होत असते हे सांगत नाही. त्यामुळे प्रचाराच्या पातळीवर शेतकरी कमी पडतात आणि सगळे लोक प्रचाराची राळ उडवून देऊन शेतकर्‍यांना बदनाम करतात. यावर आता शिकलेल्या शेतकर्‍यांनी लिहायला लागले पाहिजे आणि अशा खोटया प्रचाराला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. हा जमाना प्रसिद्धीचा आहे हे शेतकर्‍यांनी कधीही विसरता कामा नये. शेतकर्‍याला निसर्ग तर नेहमीच दणके देतो पण सरकारी यंत्रणा, सहकारी संस्थांचे सचिव, बँकांचे अधिकारी, पदाधिकारी (आणि ही सारी शेतकर्‍यांचीच मुले) कसे नाडत असतात आणि त्याचे कसे शोषण करत असतात याचेही नमुने ऐकायला मिळाले. वाईट वाटले. एवढे असूनही आपण मागे हटणार नाही असा या शेतकर्‍यांचा निर्धार आहे.

अनेक शेतकरी असे आहेत की शेती गावाकडे आणि मालक कोठे तरी शहरात नोकरी करीत आहे पण त्याच्या मनातही कधी ना कधी गावाकडे जाऊन पूर्णवेळ शेती करण्याची इच्छा आहे. या लोकांची ती सूप्त इच्छा आणि काळ्या मातीची ओढ विलक्षण आहे. ती ओढच त्याला शेती व्यवसायात येणार्‍या अडचणींशी मुकाबला करण्याचे मानसिक बळ देते. पण या ओढीची कदर शेतकर्‍यांना लुटणार्‍या या व्यवस्थेला जराही नाही. शेतकर्‍यांचा माल स्वस्तात घेऊन खायला ही बाजारपेठ सोकावली आहे. आपण खात असलेले अन्न ज्याच्या घामातून पिकले आहे. त्याला पोटभर मिळतेय की नाही असा प्रश्‍नही त्यांच्या मनात निर्माण होत नाही. इतकी ही यंत्रणा निर्दय आणि स्वार्थी आहे. निसर्ग तर आपला वैरी झाला आहेच पण हे मानवी शत्रू निसर्गापेक्षा धोकादायक आहेत. कारण निसर्ग कधी कधी आपल्यावर कृपाही करीत असतो पण हे मानवी शत्रू आपल्याला सतत नाडतच असतात. पण, मित्रांनो हा बळीराजा याही यंत्रणेला एक दिवस नमविल्याशिवाय रहाणार नाही.

Leave a Comment