तयार रोपे विकत आणण्याचे तोटे


शेतकर्‍यांना आपल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आपला शेती उद्योग नियोजनबद्धपणे करणे गरजेचे आहे. साधारणत: शेतकरी वर्ग आपल्या वर्षभराच्या कार्यक्रमाचे म्हणावे तेवढया योग्य पद्धतीने नियोजन करत नाही, असा सर्वांचाच अनुभव आहे. आपण शेतामध्ये वर्षभरात कोणती पिके घेणार आहोत याचे नियोजन गरज, हवामान आणि बाजार यावर नजर ठेवून करण्याऐवजी या वर्षी कोणाला भाव मिळालेला आहे याचा विचार करूनच केले जाते. उसाला चांगला भाव मिळाला की, सगळेच शेतकरी भराभर ऊस लावायला लागतात. टमाट्याला भाव मिळाला की, सगळे शेतकरी एकदम टमाटेच लावायला लागतात. असे सर्वांनी टमाटेच लावले की, बाजारात टमाट्यांची आवक ङ्गार होते आणि भाव कोसळतात. हे भाव शेतकर्‍यांमुळेच कोसळलेले असतात कारण, एका पिकामागे लोंढा वहात चालता की असा वहातच जातो.

काही पिकांच्या बाबतीत शेतकरी एकदमच जागे होतात. छान पाऊस पडला किंवा एखाद्या पिकाचा हंगाम जवळ आला की,त्याची लागवड करण्याची हुक्की येते. टोमॅटोची लागवड करण्याची वेळ आली की, तो लागवड करायच्या तयारीला लागतो आणि आयती तयार रोपे शोधायला लागतो. त्याच्या या नडीचा गैरङ्गायदा घेऊन रोपे तयार करणारा शेतकरी एका वाफ्याची १०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत कितीही किंमत सांगतो आणि अडलेला शेतकरी वाट्टेल तेवढे पैसे देऊन रोपे विकत घेतो. ही परिस्थिती का निर्माण झाली ? आपण मिरची, टोमॅटो किंवा कांदे अशी पिके घेण्याची योजना पूर्वीच करत नाही. ती योजना केली असती तर आपली स्वत:ची रोपे उपलब्ध झाली असती. तशी ती तयार करायला पाच-पन्नास रुपये सुद्धा लागत नाहीत. पण आपण योग्य वेळी विचार केला नाही म्हणून रोपापायी हजारो रुपये खर्चून बसतो.

हा खर्च विनाकारणच होतो. पुढे चालून आपण त्या टोमॅटोचे किंवा मिरचीचे किती पैसे झाले याचा हिशोब करायला लागतो तेव्हा आपण हजार रुपये विनाकारण खर्च केले हे लक्षात यायला लागते. तेवढा आपला नङ्गा कमी होतो. रोपे विकणार्‍यांनी कोणत्या जातीचे रोप टाकले होते याबाबतही आपण अंधारात असतो. पिकाच्या उत्पादनावर आणि नफ्यावर त्या पिकाच्या जातीचा परिणाम होत असतो. परंतु आपण केवळ नियोजन करत नाही म्हणून याही बाबतीत त्या रोपे विकणार्‍यांवर अवलंबून राहतो. नियोजन न करण्याने अनेक प्रकारे नुकसान होत असते. रोपे तयार करणारांनी बियांच्या बाबतीत बचत केलेली असते. तो काही फार खर्च करून प्रगत बियाणांचे रोप तयार करीत नाही. कारण त्याला रोपांचा खूप पैसा करायचा असतोे. तो बाजारातले कोणतेही कमी उत्पादन देणारे बी आणून त्याची रोपे तयार करून त्याला भरपूर पैसे घेऊन आपल्या माथी मारतो. त्याचा फायदा होतो पण बियाणे हलक्या दर्जाचे असल्याने आपले मात्र हजारो रुपयांचे नुकसान होते.

चांगले बियाणे वापरल्याने एकरी लाखाचे उत्पन्न होते पण त्याचवेळी बियाणावर खर्च करताना हयगय करून शंभर दोनशे रुपये वाचवण्याचा प्रयत्न केला तर हेच लाखाचे उत्पन्न पन्नास हजारावर खाली येते. या ठिकाणी बियाणे खरेदी करताना वाचवलेले शंभर रुपये आपले पन्नास हजाराचे नुकसान करून जातात. तेव्हा जो शेतकरी बियाणांजवळ सावध राहून जागरूकतेने बियाणे निवडतो तो फायद्यात रहातो. ते सावधपण पन्नास हजार रुपयांचे असते. नियोजनात बियाणाची सावधपणे आणि अभ्यासपूर्ण निवड फार महत्त्वाची असते. आपण रोपे विकत आणताना पिकाची लागवड होण्याच्या आधीच पन्नास हजार रुपयांच्या नुकसानीची सोय केलेली असते. हे सारे कळत असूनहीअसंख्य शेतकरी व्यवस्थित नियोजन करून स्वत:ची रोपे तयार करत नाहीत. त्यामुळे रोपांसाठी होणारा खर्च तर होतोच, परंतु नफ्यावरही परिणाम होतो.

त्याशिवाय इतरही अनेक प्रकारे तयार रोपे आणण्याची सवय नुकसानकारक ठरत असते. आपण जिथून रोपे आणतो तिथे रोपांची वाढ निरोगी पद्धतीने झाली आहे की नाही, हे पाहू शकत नाही. त्यामुळे रोपांच्या वाढीच्या अवस्थेतच त्यावर काही रोग पडतात आणि आपण रोपे खरेदी करून रोपांसह रोगसुद्धा आपल्या मळ्यात आणतो. त्यामुळे त्या पिकाची वाढ व्हायला लागते तसे तो रोग पीकभर पसरतो. आपल्याला औषधाचे खर्च करावे लागतात. उत्पादन दर्जेदार होत नाही. ते कमी सुद्धा होते आणि एकंदरीतच आपले सदर पिकाचे नङ्गा-तोटा पत्रक धोक्यात येते. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही. रोपासोबत आणलेला रोग आपल्या शेतामध्ये मातीत मिसळला जातो आणि तो कायमचा आपल्या शेतात मुक्कामाला येतो. तो पुढे त्याच शेतात घेतल्या जाणार्‍या नंतरच्या पिकांना सुद्धा नुकसानकारक ठरतो. हे सारे अनर्थ केवळ एक महिना आधी विचार केला नाही म्हणून आपण आपल्या हातून ओढवून घेत असतो. हे सारे खरे आहे. तरी सुद्धा शेतकरी नियोजन करत नाहीत. त्याच्यावर एक उपाय म्हणजे जेव्हा अशी पिके घेण्याची कल्पना आपल्या डोक्यात येते तेव्हा आधी रोपे टाकावीत. मग त्या पिकाच्या लागवडीला एक महिना उशीर झाला तरी चालेल. वरील सारे अनर्थ ओढवण्यापेक्षा एक महिना उशीरा लागवड झालेली परवडते.

सोलापूर जिल्ह्यात डाळिंबांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. हा जिल्हा डाळिंबांसाठी जगात प्रसिद्ध आहे. आणि तिथून करोडो रुपयांची डाळिंबे जगात निर्यात होत असतात पण गेल्या दहा वर्षांपासून या पिकाला तेल्या रोगाचा उपद्रव सुरू झाला आहे. या रोगात डाळिंबाच्या दाण्याला किंवा रसाला कसलाही त्रास होत नाही. केवळ त्याची साल खराब होते. तिच्यावर डाग पडतात. ते डाग कसलीही औषधे मारली तरी जात नाहीत. या रोगाला काही इलाज नाही असे आता तज्ज्ञांनीच म्हटले आहे. डाळींब चांगले असूनही ते विकता येत नाही कारण तेल्या रोगाने ते चांगले दिसत नाही. या तेल्या रोगाने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी डाळिंबांची लागवड करताना रोपे कोठून आणावीत याबाबत दक्षता घेतली नाही आणि स्वस्त रोपे आणण्याच्या नादात निकृष्ट रोपे खरेदी करून डाळींब लावले त्यांच्या फळांवर हा रोग पसरला आहे. म्हणजे रोप विकत आणताना केलेली शंभर दोनशे रुपयांची काटकसर त्यांना आणि सर्वांनाच करोडो रुपयांना पडली आहे. नियोजन करताना स्वत:च रोपे तयार करावीत किंवा विकत आणायचीच असतील तर ती खात्रीशीर असावीत. नसता मोठे नुकसान होते.

Leave a Comment