युट्युब वरील खाद्य जाहिराती वाढविताहेत मुलांमध्ये लट्ठपणा

फोटो साभार इंडियन एक्सप्रेस

अमेरिकेतील पिडियाट्रिक जर्नल मध्ये एक अतिशय धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार युट्यूबवर मुलांना खाद्यपदार्थ संबंधातील ४०० हून अधिक व्हिडीओ असे आहेत ज्यात साखर, जंक फुडच्या जाहिराती आहेत. या जाहिराती पाहून लहान मुलांमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे आणि त्यामुळे लहान मुले वेगाने लट्ठपणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

विशेष म्हणजे ही परिस्थिती अमेरिकेप्रमाणेच भारतातही आहे. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटल मधील डॉ.आरती यांच्या म्हणण्यानुसार स्क्रीनवर जंक फूड जाहिराती पाहून मुले याच पदार्थांचा हट्ट करतात. वय वाढत जाते तशी ही सवय वाढत जाते. जाहिरातीमध्ये ९० टक्के जाहिराती आरोग्याला अपायकारक मानल्या गेल्या आहेत. त्यात नामवंत कंपन्या आणि अनेक बडे ब्रांडची उत्पादने सामील आहेत.

मिल्कशेक, फ्रेंच फ्राईज, सॉफ्टड्रिंक्स, चीजबर्गर आज लाखो मुलांचे आवडते खाणे आहे. सध्या शाळा बंद असल्याने मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. त्याचा वापर करून या कंपन्या आणि ब्रांड मुलांना निशाना बनवीत आहेत. परिणामी मुलांमध्ये लट्ठपणा वाढतो आहे. ८० टक्के पालकांनी त्यांची मुले युट्यूब पाहतात असे सांगितले आहे.

अमेरिकेत २ ते १९ वयोगटातील मुलांमधील २० टक्के मुले लट्ठ असून त्याच्याशी या जंक फूडचा थेट संबंध आहे असेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.