पोर्तुगाल एक अजब देश

फुटबॉल ज्यांना आवडतो त्यांना पोर्तुगाल हे नाव नवे नाही. नामवंत फुटबॉलपटू या देशाने दिले आहेत. पण या शिवाय या देशाच्या अनेक खासियती आहेत. युरोप मधील हा प्राचीन देशांपैकी एक देश. येथील राहणीमान, भाषा, वेशभूषा, संस्कृती अन्य युरोपीय देशांपेक्षा वेगळ्या आहेत. ११२८ मध्ये या देशाची स्थापना झाली असे इतिहास सांगतो. दर्यावर्दी लोकांचा देश अशीही त्याची एक ओळख आहे.

या देशातील कोयम्बारा विश्वविद्यालय जगातील जुन्या विद्यापीठांपैकी एक असून राजधानी लिस्बन मध्ये या विद्यापीठाची स्थापना १२९० मध्ये झाली. येथील लायब्ररी किंवा वाचनालय जगात प्रसिध्द आहे. या लायब्ररीच्या भिंती सोन्याने मढविलेल्या आहेत. याचे कारण पुस्तकांना वाळवी लागू नये असे आहे. शिवाय चुकून वाळवी आलीच तर तिचा फडशा पडण्यासाठी येथे वटवाघळे पाळली गेली आहेत. लायब्ररीतील अनेक पुस्तकांना सोन्याची कव्हर आहेत.

युनेस्कोने या देशातील १५ स्थळे जगातील वारसा दर्जा देऊन गौरविली आहेत. त्यात अल्कोव मठ, बटाला मठ, अल्टो डोरो वाईन यांचा समावेश आहे. जगप्रसिध्द खलाशी वास्को द गामा याच देशाचा रहिवासी. त्याने  १४९८ मध्ये समुद्रमार्गे भारताचा शोध लावला. लिस्बन मध्ये त्याच्या नावाचा एक प्रचंड पूल असून युरोपातील हा सर्वाधिक लांबीचा पूल आहे. त्याची लांबी आहे १७ हजार मीटर.

या देशात पाण्याखालील सर्वात मोठे कृत्रीम पार्क असून त्याचे नाव आहे ओशियन रिवायवल अंडरवॉटर पार्क. याच देशातील शेफने २०१२ मध्ये जगातील सर्वात मोठे ऑम्लेट बनवून विश्वरेकॉर्ड केले आहे. त्याने ६.४६६ टन म्हणजे ५४४३ किलोचे ऑम्लेट बनविले होते.