पाकिस्तानने फ्रांस मध्ये नसलेल्या राजदूताला परत बोलावून करून घेतले हसे

फोटो साभार द नॅॅशनल

राष्ट्रपती सॅम्युअल मँक्रो यांच्या इस्लामविरोधी वक्तव्यावरून निंदा प्रस्ताव संसदेत व्यक्त करताना पाकिस्तानने स्वतःचे हसे करून घेतल्याची घटना घडली आहे. संसदेत परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी फ्रांस मधून पाकिस्तानच्या राजदूताला परत बोलावण्याचा प्रस्ताव सादर केला आणि विरोधी पक्षासह सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला. मात्र त्यावेळी फ्रांस मध्ये सध्या पाकिस्तानचा राजदूत म्हणून कुणीही नियुक्त नसल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. फ्रांसचे राष्ट्रपती सॅम्युअल मँक्रो यांच्या इस्लामविरोधी विधानामुळे जगभरातील मुस्लीम देश निषेध व्यक्त करत असून त्यात पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश आहे.

परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या हातून झालेल्या या मोठ्या चुकीमुळे कुरेशी त्यांच्या मंत्रालयाबाबत किती अनभिज्ञ आहेत हे जगासमोर आले आहे. गेले तीन महिने फ्रांस मध्ये पाकिस्तानचा राजदूत नाही. तेथील राजदूत मोईन उल हक याना तीन महिन्यापूर्वी परत बोलावले गेले होते आणि त्यांची नियुक्ती चीनचे राजदूत म्हणून केली गेली होती. तेव्हापासून फ्रांस मध्ये पाकिस्तान राजदूताची जागा रिकामी असून सध्या पॅरीस दुतावासात पाकिस्तानचे मोहम्मद अजीज दूतावास मिशन उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

याचवेळी पाकिस्तान मधील फ्रांसच्या राजदूताला परत मायदेशी पाठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. मात्र खरोखरच हे पाउल पाकिस्तानने उचलले तर दोन्ही देशातील संबंध ताणले जातील असे सांगितले जात आहे.