बोलिव्हीयाचे उलट चालणारे घड्याळ


दक्षिण अमेरिकी देश बोलिव्हीयातील एका शहरात घड्याळ्याचे काटे उलट्या क्रमाने बसविले गेले असून हे घड्याळ नेहमीच्या घड्याळ्याच्या उलट दिशेनेच चालते. ला पाज या शहरातील देशाच्या संसद इमारतीवर हे घड्याळ बसविले गेले आहे. विदेश मंत्री डेव्हीड यांनी या घड्याळाचे नामकरण दक्षिणेचे घड्याळ असे केले आहे. स्वतः डेव्हीड अशाच प्रकारचे मनगटी घड्याळ वापरत आहेत.

या विषयी स्पष्टीकरण देताना ते म्हणाले बोलिव्हीयातील नागरिकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी कायम जागरूक असले पाहिजे याची जाणीव देण्यासाठी हे उलटे घड्याळ आहे. यातून असा संदेश दिला गेला आहे की जगरहाटीप्रमाणेच चालणे गरजेचे नाही तर नवीन सृजनात्मक विचारही पुढे आले पाहिजेत. यातून स्थापित मान्यतांना आव्हानही दिले गेले पाहिजे. घड्याळ्याचे काटे एकाच दिशेने फिरणे ही जगरहाटी आहे. आपण दुसर्‍यांची मते नेहमी का मान्य करायची? त्याऐवजी नवीन विचार का रूजवू नये.आम्ही उत्तर अमेरिकेत नाही तर दक्षिण अमेरिकेत आहोत. आम्हाला आमचे कांही विचार आहेत. त्यासाठी हे घड्याळ उलटे चालणारेच आहे.

सांताक्रूझ येथे झालेल्या जी ७७ च्या बैठकीतील प्रतिनिधिनांही अशीच दक्षिणेची टेबल क्लॉक भेट म्हणून दिली गेली आहेत. या घड्याळांचा आकार बोलीव्हीयाच्या नकाशासारखा होता असे समजते. ही घड्याळे इच्छुकांना विकतही मिळू शकणार आहेत.

Leave a Comment