जॉब हॉपिंगचे परिणाम


एखादी नोकरी मिळाली की ती टिकून करावी. ते चांगले लक्षण असते असे जुने लोक मानत असत. त्यामुळे एकजण एखाद्या नोकरीला चिकटला की तो ४० वर्षे सेवा करून मगच रिटायर होणार असे पूर्वी घडत असे. काही जणांच्या बाबतीत ती कौतुकाचेही असे. एखादा माणूस सरकारी नोकरीला चिकटला की त्याला ३५ ते ४० वर्षे ती नोकरी सोडण्याचे काही कारणच नसते. कारण ती नोकरी शेवटी कायम असते आणि नियमाने प्रमोशन मिळवत मिळवत तो तिथे बर्‍याच मोठ्या पगारावरून मोठ्या पेन्शनसह निवृत्त होत असतो. खाजगी नोकरीबाबत असे होत नाही. आता आता तर मुले अनेक नोकर्‍या करायला लागली आहेत. एखादी नोकरी लागली की ते तिला वर्षाभरातच सोडायला लागले आहेत. याला जॉब हॉपिंग असे म्हणतात.

हॉपिंगचा अर्थ आहे इकडून तिकडे टणाटण उड्या मारणे. अशा उड्या मारणे कदाचित जुन्या काळात वाईट मानले जात असेल पण आता ते तसे मानले जात नाही. उलट सतत तंत्रज्ञान बदलत चालले असल्याने एका तंत्रज्ञानाचा कंटाळा आला की दुसर्‍या प्रकराच्या तंत्रज्ञानाशी संबंधित नोकरी करण्याकडे मुलांचा कल आहे. हा वेगाने होणार्‍या बदलांचा परिणाम आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे तेव्हा आपण ज्या तंत्रज्ञानाशी संबंधित नोकरी करीत आहोत ते तंत्रज्ञान उद्या चालून कालबाह्य झाले तर आपणही कालबाह्य ठरू अशी भीती मुलांना वाटत आहे. तेव्हा तरुण आहोत तापर्यंत आणि अजून नव्या नोकरीत स्वीकारले जाऊ शकतो तोपर्यंतच नव्या क्षेत्रात उडी मारावी असा विचार तो करतो.

नोकरी करणार्‍या तरुणांचा याबाबतचा कल जाणून घेतला असता असे दिसून आले की ७३ टक्के मुलांना नोकरी वारंवार बदलण्यात काही गैर वाटत नाही. काही मुलांना आपल्या आहे त्या नोकरीत आपल्या गुणवत्तेला म्हणावी तशी चालना मिळत नाही असे वाटत असते म्हणून ते नोकरी बदलतात. ही बाब आज ङ्गार आक्षेपार्ह समजली जात नसली तरीही त्यात एक धोका आहे. एखादा तरुण एखाद्या कंपनीत कामाला लागतो आणि वर्षा दोन वर्षात बाहेर पडतो. अशाने तो त्याच्या कामाचे सखोल ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. त्यासाठी १० ते २० वर्षे सेवा केली पाहिजे. सतत उड्या मारणारे हे उमेदवार कोणत्याही तंत्रज्ञानात निष्णात होऊ शकत नाहीत. हा जॉब हॉपिंगचा दुष्परिणामच आहे.

Leave a Comment