कोरोना काळात बंद असलेल्या उद्यानांवर मुंबई महापालिकेने उधळले 22 कोटी


मुंबई : मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने, बगीचे, क्रीडांगणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद होती. उद्यान व मैदानांच्या देखभाल व दुरुस्तीवर याच कालावधीत तब्बल 22 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आला असताना त्यांना कालावधी वाढवून ही रक्कम खर्च करण्यात आल्याने पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोरोना काळात मुंबईकरांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप केला जात आहे. स्थायी समितीत या प्रस्तावावरून गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कंत्राटदारांची नेमणूक मुंबईतील 24 विभागांतील महापालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे इत्यादी जागेचा विकास व देखभालीसाठी करण्यात आली आहे. स्वतंत्र कंत्राटदारांची निवड जानेवारी 2017 रोजी 24 विभागांसाठी करण्यात आली. 180 कोटी 68 लाख रुपयांचे या तीन वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले होते. 31 मार्च 2020 रोजी हा कालावधी संपुष्टात आला. पण उद्यान विभागांच्या अधिकार्‍यांशी या कंत्राटदारांशी साटेलोटे असल्याने त्यांनी याची निविदा काढण्यास विलंब केला. परिणामी कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुढील निविदा प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे जुन्याच कंत्राटदारांकडून पुढील कामे करून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील उद्याने व मैदाने ही नागरिकांसाठी 23 मार्चपासून सप्टेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. कोणालाही या उद्यान व मैदानांमध्ये प्रवेश नव्हता. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात मैदान व उद्यानांसह वाहतूक बेटांवर 21 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या कंत्राटदारांना महापालिकेने 180 कोटी 68 लाख रुपयांचे कंत्राट दिलेले असताना सहा महिन्यांचा कालावधी त्याच कंत्राटदारांना वाढवून देण्यात आल्यामुळे या वाढीव कालावधीत 21 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, ही वाढीव रक्कम कंत्राटदारांना देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.