आगळेवेगळे टॉयलेट म्युझियम


पाच हजार वर्षांचा सॅनिटेशनचा इतिहास दाखविणारे आणि जगातील टॉयलेट भांड्यांच्या असंख्य प्रकारांचे दर्शन घडविणारे आगळे वेगळे संग्रहालय – सुलभ इंटरनॅशनल म्युझियम बिंदेश्वर पाठक यांनी उभारले आहे. भारतात पे अॅन्ड युज टॉयलेटची संकल्पना प्रथम आणणार्‍या बिंदेश्वर यांनी मानवी मैला डोक्यावरून वाहून नेण्याच्या प्रथेविरोधातही आंदोलन छेडले होते.

भारतातील जनसामान्यात सांडपाणी व्यवस्थापनाविषयी जागृती व्हावी आणि देशातील सॅनिटेशनची परिस्थिती समजावी या उद्देशाने हे संग्रहालय उभारले गेले असल्याचे पाठक सांगतात. १९९२ पासून हे संग्रहालय उभारणी सुरू असून जगातील १० अनोख्या संग्रहालयात हे संग्रहालय तिसर्‍या स्थानावर आहे. टॉयलेट संदर्भात माहिती देणारे हे जगातील एकमेव संग्रहालय आहे.

यात हडाप्पा संस्कृतीतील सॅनिटेशन पासून ते नासाच्या अत्याधुनिक आणि जगातील सर्वात महागड्या टॉयलेटपर्यंत अनेक प्रकार दर्शविले गेले आहेत. त्यात अनेक प्रकार फोटोतून दाखविले गेले आहेत.फतेपूरसिक्री येथील बाथरूम्स, अजमेर फोर्ट, गोळकोंडा येथील सांडपाणी व्यवस्था, टेबल, स्टूलच्या आकाराची टॉयलेट, मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या पॉटी, ऑस्ट्रीयाची राजकन्या वापरत असलेली सोन्या चांदीची टॉयलेट, लिओनार्डो विंचीने फ्लश टॉयलेटची केलेली रेखाटने, मनुस्मृतीपासून विष्णुपुराणापर्यंत सॅनिटेशनसंबंधीच्या केल्या गेलेल्या सूचना असे अनेक माहितीपर फोटो आणि प्रत्यक्ष उपकरणे येथे मांडली गेली आहेत.

जगातील सर्वाधिक महागडे म्हणजे १९ दशलक्ष डॉलर्स खर्चून बांधल्या गेलेल्या नासातील टॉयलेटचे फोटोही येथे मांडले गेले आहेत. मलेशियात हत्तींना लीद रस्त्यावर टाकू नये म्हणून दिले जात असलेले प्रशिक्षण, हॉटेल्समध्ये खास जोडप्यांसाठी बांधलेली ट्वीन टॉयलेट असेही अनेक आश्वर्यकारक प्रकार येथे पाहण्यासाठी मांडले गेले आहेत

भारतात कांही शहरातच सॅनिटेशनची व्यवस्था चांगली आहे असे बिंदेश्वर पाठक यांचे निरीक्षण आहे. चांगली सॅनिटेशन व्यवस्था ही मानवी संस्कृतीची गरज आहे .पूर्ण देशात ही व्यवस्था चांगली असावी असा त्यांचा उद्देश आहे. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकणारी अत्याधुनिक सोलर, इलेक्ट्रीकल टॉयलेटची मॉडेल्सही येथे पाहता येतात.

Leave a Comment