हिंदुंच्या संख्येत कुटुंब नियोजनामुळेच घट – साध्वी प्रज्ञासिंह


भोपाळ: भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी देशात हिंदुंच्या संख्येत कुटुंब नियोजनामुळे घट होत असल्याचे म्हटले आहे. साध्वी प्रज्ञासिंह मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात पोहोचल्या. त्यांनी त्यावेळी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर तोफ डागली. सोबतच जनतेला कुटुंब नियोजनाबाबत एक सल्लाही देऊन टाकला. हिंदुंच्या संख्येत कुटुंब नियोजनामुळेच घट होत असल्याचे सांगत कुटुंब नियोजन करु नका असा सल्लाच अप्रत्यक्षपणे त्यांनी देऊन टाकला.

विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी कुटु्ंब नियोजनामुळे हिंदुंची संख्या घटत असल्याचे म्हटले. आपल्या मुलांचे हिंदुंनी संरक्षण करावे. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर जे धन आता कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणे शिकले पाहिजे. त्यामुळे मुलांना तुमच्या राष्ट्रवाद शिकवा. आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार वादंग निर्माण झाले आहे.

एका महिला भाजप उमेदवाराबद्दल मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. प्रज्ञासिंह यांनी त्यावरुनही कलमनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भारतीय असाल तर महिलांचा सन्मान करणे शिका, नाहीतर तुमचीही अवस्था रावणाच्या पुतळ्याप्रमाणे होईल, असा इशारा प्रज्ञासिंह यांनी कमलनाथ यांना दिला. ज्यांनी भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल आयटम हा शब्द वापरला, ते आपली आई, बायको, बहिणीलाही याच नावाने हाक मारतात का? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी कमलनाथांना विचारला.

धर्म आणि अधर्मात भेद करणे भोपाळची जनता जाणते. धर्म आणि अधर्म अशीच लोकसभा निवडणूक ही लढली गेली आणि त्यांना भोपाळच्या जनतेने दाखवून दिले की अधर्मावर नेहमी धर्माचाच विजय होत असतो, अशा शब्दात प्रज्ञासिंह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली. तर प्रज्ञासिंह यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या आम्ही तिरंगा उचलणार नसल्याच्या वक्तव्यावरही जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुफ्ती यांना अब देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा, अशा इशाराच दिला आहे.