खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रक्षा खडसेंची भाजप आयोजित बैठकीला दांडी


जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार रक्षा खडसेंनी भाजपने आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील बैठकीला दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी होत असल्याची माहिती आहे. माध्यमांना भाजपच्या या तातडीच्या बैठकीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपची जळगाव जिल्ह्यात पहिलीच बैठक होत आहे.

जळगावमध्ये परतल्यानंतर खडसेंनी बैठका घ्यायला सुरूवात करुन अ‌ॅक्शन मोडमध्ये असल्याचे दाखवून दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमवारी गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जामनेरमध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी भाजप काय पावले उचलते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.