सोने खरेदी करताय? येथे मिळेल स्वस्त सोने

फोटो साभार अमर उजाला

सोने लुटण्याचा सण दसरा नुकताच झाला आहे आणि दिवाळी तोंडावर आहे. अनेकजण धनत्रयोदशी, पाडवा या दिवशी आवर्जून सोने खरेदी करतात. भारतात सध्या सोन्याचे भाव खुपच वाढले आहेत. तरीही तुम्हाला सोने स्वस्तात खरेदी करायची संधी आहे. त्यासाठी मात्र केरळ किंवा भारताबाहेर जाण्याची तयारी हवी. भारतापेक्षा स्वस्त सोने कुठे मिळते याची माहिती आम्ही येथे देत आहोत.

सोने हा असा एक धातू आहे ज्याची साठवण जगभरातील सर्व देश आवर्जून करतात आणि जगातील सर्व नागरिक सोने खरेदी करून त्याचे दागिने घडवितात. इतकेच नव्हे तर गुंतवणूकदार सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्यास नेहमीच प्राधान्य देत असतात. भारतात या वर्षी सोने भाव गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहेत. पण या देशातून तुम्हाला भारतापेक्षा १५ टक्के स्वस्त सोने मिळू शकते.

बाहेर देशात जायची तयारी नसेल तर तुम्ही केरळ मधील कोचीनला सोने खरेदीसाठी जाऊ शकता. देशातील अन्य शहरांपेक्षा येथे सोने स्वस्त मिळते. मलबार गोल्ड, भीमा, जॉय लुकास अशी अतिभव्य दुकाने कोचीनच्या बाजारात सोन्याच्या शेकडो प्रकारच्या दागिन्यांनी सज्ज आहेत. बाहेर देशात जाणार असाल तर दुबईचा विचार करा. येथील सोने बाजार जगप्रसिध्द असून येथे लाखो व्हरायटी पाहायला मिळतील. येथे सोने स्वस्त आहेच पण चोख सोन्यासाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात अनेक भारतीय सराफांची दुकाने आहेत.

थायलंड हा सोने खरेदीसाठी आणखी एक फायदेशीर देश. बँकॉक बाजारात सोने किफायतशीर दरात आणि चोख मिळते. येथे सोने विक्रीतील मार्जिन कमी आहे. व्हरायटी खूप आहे. चायना टाऊन मधील यावोरात रोड सोनेखरेदी साठी प्रसिध्द आहे.

हॉंगकॉंग सोने खरेदीचे हब म्हणून ओळखले जाते. येथेही सोन्याचे दर अन्य देशांपेक्षा कमी असतात. हे जगातील सर्वात अॅक्टीव्ह गोल्ड ट्रेडिंग मार्केट आहे. स्वित्झर्लंड सुद्धा सोन्यासाठी प्रसिध्द आहे. येथील डिझायनर घड्याळे जगभर लोकप्रिय आहेत. येथे सोन्याचे खप प्रचंड आहे आणि शुद्ध सोने रास्त भावात मिळते. येथे हाताने घडविलेले दागिने विशेष प्रसिध्द आहेत.