सर्वाधिक मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत चीनी कंपनी अँट ग्रुप

फोटो साभार वॉल स्ट्रीट जर्नल

जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी चीनी कंपनी अँट ग्रुपने केली असून या आयपीओ मधून ३५ अब्ज डॉलर्स जमा होतील असे अंदाज बांधले जात आहेत. अँट ग्रुप शांघाय आणि हॉंगकॉंग मध्ये हा आयपीओ आणत असून हे साध्य झाले तर हा इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल. चीनी जायंट ई कॉमर्स कंपनी अलीबाबाशी अँट ग्रुप संबंधित आहे. हा ग्रुप शांघाय आणि हॉंगकॉंग शेअर बाजारात त्यांचे शेअर लिस्ट करत आहे.

ही कंपनी आर्थिक क्षेत्रातील कंपनी आहे. अनेक प्रकारच्या आर्थिक उत्पादनांचे परिचालन त्यांच्यातर्फे केले जाते. अलीबाबाच्या अली पे डिजिटल वॉलेटचा त्यात समावेश आहे. हे जगातील सर्वात मोठ्या मुद्रा बाजारांपैकी एक आहे. आयपीओची घोषणा होताच कंपनीचा शेअर सोमवारी चीन बाजारात ६८.८ युआन (१०.२६ डॉलर्स) ला तर हॉंगकॉंग बाजारात ८० हॉंगकॉंग डॉलर्स म्हणजे १०.३२ अमेरिकी डॉलरवर गेला.

गतवर्षी सौदीच्या अमराकोने आयपीओ मधून २९ अब्ज डॉलर्सची कमाई शेअर विक्रीतून केली होती. आता हा विक्रम मोडीत काढत अँट ग्रुप ३४.५ अब्ज डॉलर्स शेअर विक्रीतून कमावण्याच्या प्रयत्नांत आहे.