गुजरात दंगल, एसआयटी चौकशीला असे सामोरे गेले होते नरेंद्र मोदी

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशी साठी सीबीआयचे विशेष पथक (एसआयटी) नेमले गेल्यानंतर कुणा संशयिताची किती तास चौकशी झाली याच्या जोरदार चर्चा सुरु असताना सीबीआयचे माजी प्रमुख आणि २०२० च्या गुजराथ दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख आरके राघवन यांचे नवीन पुस्तक ‘ ए रोड वेल ट्रॅव्हल्ड’ मधून गुजरात दंगे चौकशीचे अनेक पैलू समोर आले आहेत.

या पुस्तकात राघवन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची चौकशी कशी केली गेली आणि त्यावेळी मोदींचे वर्तन कसे होते याचे वर्णन केले आहे. राघवन लिहितात, सतत नऊ तास म्हणजे दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मोदींना १०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले होते. या सर्व काळात मोदी यांनी अतिशय शांतपणे प्रश्नांची उत्तरे दिलीच पण वारंवार चहा घेणार का असे विचारल्यावर एक कप चहा घेण्यास सुद्धा नकार दिला होता. चौकशी साठी त्यांना एसआयटीच्या ऑफिस मध्येच उपस्थित राहावे लागेल असे सांगितले गेल्यावर त्यांनी तत्काळ त्याला होकार दिला. चौकशी साठी येताना ते स्वतः ची पाण्याची बाटली बरोबर घेऊन आले होते.

गुजराथ दंगलीत सीबीआय आणि एसआयटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी करत होते पण राजकीय कारणांमुळे ही चौकशी विशेष चर्चेत होती. राघवन सांगतात, या काळात मी एसआयटी प्रमुख होतो पण तरीही मोदी आणि माझ्यामध्ये अगोदरच काही ठरले असेल असा आरोप केला जाऊ नये म्हणून त्यांनी ही जबाबदारी अशोक मल्होत्रा या अधिकाऱ्यावर सोपविली होती. इतकेच नव्हे तर राघवन आणि मोदी यांच्यात फोनवरून काही बोलणी होतात काय यावर नजर ठेवण्याचे काम केले जात होते. राघवन यांनी मोदींची चौकशी करण्याचे काम अन्य अधिकाऱ्यावर सोपविल्याबद्दल अनेक महिन्यानंतर हरीश साळवे यांनी हा निर्णय अगदी योग्य होता असा निर्वाळा दिला होता.

गुजराथ एसआयटीचे नेतृत्व करण्यापूर्वी राघवन सीबीआय प्रमुख होते. त्यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना झालेला बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, क्रिकेट मॅच फिक्सिंग, अश्या अनेक हायप्रोफाइल केसेसचा तपास केलेला आहे. गुजराथ दंगल चौकशीत मोदींसह अन्य ६३ लोकांना एसआयटीने क्लीन चिट दिली होती.