या सरोवरावर अखंड चमकतात विजा

फोटो साभार पिंटरेस्ट

विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी जगभरात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत ज्या मागचे रहस्य अजून अज्ञात राहिले आहे. द. अमेरिकेतील वेनेझुएला देशातील एक सरोवर असेच रहस्यमयी आहे. या सरोवरावर अखंड विजा कडाडत असतात आणि त्यामागचे कारण अजून समजलेले नाही. वास्तविक आकाशात एका जागी दोन वेळा वीज चमकत नाही असे सांगितले जाते. मात्र येथे तासात किमान हजारवेळा विजा चमकतात.

या ठिकाणाला बीकन ऑफ मॅराकाईबो असे म्हटले जाते. पण त्याला अन्य नावानी सुद्धा ओळखले जाते. कॅटाटूम्बो लायटनिंग, एव्हरलास्टिंग स्टॉर्म, ड्रॅमॅटीक रोल ऑफ थंडर अशीही काही नावे आहेत. या भागाला नैसर्गिक वीजगृह असेही म्हटले जाते. बीबीसीच्या माहितीनुसार मॅराकुम्बो सरोवराला कॅटातुम्बो नदी जेथे मिळते, तेथे वर्षातील २६० दिवस वादळी दिवस असतात. रात्रभर येथे विजा होतात. त्याची नोंद गिनीज बुक मध्ये घेतली गेली आहे. पावसाळ्यात दर मिनिटाला येथे २८ वेळा वीज चमकते आणि या विजा इतक्या प्रकाशमान असतात की ४०० किमी वरून सुद्धा त्यांचा प्रकाश दिसतो.

१९६० च्या दशकापासून येथे संशोधन केले जात आहे. काही वैज्ञानिकांनी येथे युरेनियमचे प्रमाण जास्त आहे म्हणून विजा अधिक होतात असा निष्कर्ष काढला आहे तर काही जणांनी येथे सरोवराजवळ तेल क्षेत्रात मिथेन वायू अधिक असल्याने विजा होतात असे म्हटले आहे. मात्र हे दोन्ही दावे विज्ञानाच्या कसोटीवर सिध्द होऊ शकलेले नाहीत.