ब्रिटनमधील सर्वसामान्यांना पुढील आठवडयापासून मिळणार ऑक्सफर्डच्या लसीचे डोस ?


ऑक्सफर्डने तयार केलेली लस कोरोना व्हायरस विरोधात गेमचेंजर ठरु शकते. या व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचे या व्हायरसने मोठे नुकसान केले. लाखो लोकांचे जीवनमानच या व्हायरसने बदलून टाकले आहे.

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचे नाव AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 असे आहे. ही लस ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी विकसित केल्यानंतर अस्त्राझेनेकाला या लसीचा एप्रिल महिन्यात परवाना दिला. अस्त्राझेनेकावर मानवी चाचण्यांना गती देण्याची आणि उत्पादनाची जबाबदारी आहे. अस्त्राझेनेकाने नंतर जगातील वेगवेगळया कंपन्या आणि सरकारांबरोबर लसीचा पुरवठा आणि उत्पादनाचे करार केले. या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने भारतात सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत आहे.

लंडनमधील महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लशीची पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार रहा, असे सांगण्यात आले असून या संदर्भातील वृत्त ‘द सन’ या वर्तमानपत्राने दिले आहे.

ही लस कोरोना व्हायरसची साथ संपवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच पुढच्या आवठडयापासून कोरोना लसीसाठी तयार राहा, असे यूकेमधील महत्त्वाच्या रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. ऑक्सफर्डची लस जगातील अनेक देशात मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

या लसीपासून वर्षभर संरक्षण मिळू शकते, असे कंपनीच्या सीईओंनी जून महिन्यात म्हटले होते. ही लस दिल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तींमध्येही मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा रिपोर्टमधून करण्यात आला आहे. AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 लस टोचल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अँटीबॉडी आणि टी सेल्सची निर्मिती झाली असे फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ब्रिटन, भारतच नाही तर ब्राझील, अमेरिका या देशातही ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत. मान्यता मिळाल्यानंतर जगातील बहुतांश देशांमध्ये ही लस उपलब्ध आहे.