तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो; निलेश राणेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान


मुंबई – दसरा मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणे यांच्या पुत्रांनी टीकेची तोफ डागली आहे. बेडकाशी नारायण राणे यांची तर बेडकाच्या पिलांशी त्यांच्या दोन्ही पुत्रांची तुलना केल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निलेश राणे यांनी आव्हान दिले आहे.


रविवारी दसरा मेळाव्यातून गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते राज्यपाल भगतसिंह यांच्यावरही यावेळी त्यांनी निशाणा साधला. ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य करताना नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. “नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य, पण बिहारवर २० मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो,” अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.