तैवानला शस्त्रास्त्र विकल्याबद्दल चीनचे अमेरिकन कंपन्यांवर निर्बंध


बीजिंग: लॉकहीड मार्टीन आणि बोईंगचा संरक्षण विभाग यांच्यासह काही अमेरिकन कंपन्यांवर चीनने निर्बंध लादले आहेत. तैवानला २०० कोटी डॉलरची शस्त्रास्त्र विकल्याबद्दल हे निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेने तैवानला शस्त्रपुरवठा थांबवावा, असे आवाहन चीनने केले आहे. तैवान हे स्वतंत्र बेट असले तरीही तो आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे.

सामरिक वर्चस्व, बाजारपेठ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्वावरून चीन आणि अमेरिका यांच्यात स्पर्धा आहे. तैवानच्या मुद्द्यावरून या संघर्षांची कोणत्याही क्षणी ठिणगीपाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तैवान हा चीनचा अविभाज्य घटक आहे. त्याचा ताबा मिळविण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर केला जाईल, असा इशाराही चीनने दिला आहे.

अमेरिकेने तैवानला ‘स्लॅम एर’ क्षेपणास्त्र पुरविली आहेत. तैवानला सध्याच्या आणि भविष्यातील धोक्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी ता क्षेपणास्त्रांचा उपयोग होईल, असा अमेरिकेचा दावा आहे. या क्षेपणास्त्रांमुळे तैवानच्या सामरिक शक्तीत वाढ झाली असून शस्त्रसंतुलनासाठी त्याचा उपयोग होणार आहे, असे तैवानने म्हटले आहे.