येथे रचले गेले रामायण आणि येथेच जन्मले लव कुश

सुष्टाचा दुष्टावर विजय म्हणून साजरी होणारी विजयादशमी म्हणजे दसरा काल देशभर साजरा करण्यात आला. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता म्हणून त्याला विजयादशमी असे म्हटले जाते. रामायण या २४ हजाराहून अधिक श्लोक असलेल्या महाकाव्याची रचना जेथे केली गेली आणि रामसीतेचे लवकुश हे जुळे मुलगे जेथे जन्माला आले ते स्थान पंजाबच्या अमृतसर मध्ये असून त्याला रामतीर्थ किंवा वाल्मिकी तीर्थ म्हटले जाते.

सध्या या जागी रामतीर्थ मंदिर असून ते रामाला समर्पित आहे. येथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता आणि येथेच त्यांनी रामायणाची रचना केली असे सांगितले जाते. तसेच जेव्हा रामाने सीतेचा त्याग करून तिला वनात पाठविले तेव्हा सीता याच आश्रमात राहिली होती आणि लव कुश यांचा जन्म येथेच झाला असेही मानले जाते. इतकेच नव्हे तर त्याच जागी लवकुश यांनी रामाने सोडलेला अश्वमेध घोडा अडविला आणि रामाबरोबर युध्द केले होते.

येथे एक मोठे सरोवर असून ते हनुमानाने खोदले असे मानतात. ३ किमी परिसरात हे सरोवर असून त्याची परिक्रमा केली जाते. याच परिसरात एक प्राचीन विहीर असून तेथे सीता स्नान करत असे असे सांगतात. या विहिरीवर स्नान करून महिला संतानप्राप्ती साठी नवस करतात. अवती भवती अनेक मंदिरे आहेत.

याच परिसरात वाल्मिकी कुटी मध्ये ८ फुटांची सोन्याचा लेप दिलेली महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती आहे. याच परिसरात राम सीता मिलन स्थळ असून येथे भाविक विटांपासून छोटी घरे बनवितात. त्यामागे स्वतःच्या मालकीचे घर बनावे असा नवस केलेला असतो. येथे दर कार्तिकी पौर्णिमेला चार दिवसांची जत्रा भरते.