जगातील महागडी कॉफी, एका कपासाठी मोजा ६५ हजार रुपये

फोटो साभार यु ट्यूब

दोस्तांच्या मनपसंत संगतीत कॉफीची मजा काही और आणि त्याची किंमत पैशात करता येणार नाही हे खरे असले तरी महागात महाग कॉफी किती रुपयांना मिळत असेल याची उत्सुकता असतेच. महागात महाग कॉफी फारतर ५०० रुपये किंवा १ हजार रुपयाला असेल असा अंदाज करत असला तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात असे समजा. जगातील सर्वात महाग कॉफी जपानच्या ओसाका शहराजवळ असलेल्या एका कॅफे मध्ये विकली जाते आणि एक कप कॉफीची किंमत आहे ६५ हजार रुपये.

बेहद खास स्वाद हे या कॉफीचे वैशिष्ट आहेच पण ती २२ वर्षे जुनी असते ही याची खासियत. अर्थात ही कॉफी बनली एका चुकीमुळे आणि आता तिची चर्चा जगात दूरपर्यंत होते आहे. ही कॉफी बनविताना कॉफीच्या बिया दळून त्या कपड्यात बांधल्या जातात आणि त्यावर गरम पाणी ओतले जाते. कपड्यातून कॉफीचा पाहिला थेंब बाहेर यायला अर्धा तास लागतो. पण बेजोड स्वादाची कॉफी यातून तयार होते. नंतर या प्रकारे गाळून खाली आलेली कॉफी लाकडी बॅरल मध्ये २२ वर्षे साठविली जाते. त्यानंतर ती वापरात आणली जाते. हा स्वाद चॉकलेट आणि दारू यांचा मिक्स स्वाद असतो.

या कॅफेचे नाव मंच हाउस असे आहे. मालक तनाका सांगतो या कॉफीचा शोध चुकीतून लागला आहे. पूर्वी तो आईसकॉफी विकत असे आणि ती जलद तयार व्हावी म्हणून बिया फ्रीज मध्ये ठेवत असे. पण एकदा तो बिया फ्रीज मध्ये ठेवायला विसरला आणि जवळ जवळ दीड वर्षानंतर त्याला या बियांची आठवण झाली. त्याची टेस्ट बिघडली का हे पाहण्यासाठी त्याने दळून कॉफी बनविली तर ती अधिकच स्वादिष्ट झाली होती. मग त्याने लाकडी बॅरल मध्ये ही कॉफी १० वर्षे साठविली तेव्हा ती औषधांसारखी लागली पण २० वर्षे साठविल्यावर मात्र तिला मद्याचा स्वाद आला होता. या नवीन स्वादाची कॉफी ग्राहकांना खुपच पसंत पडली आणि मग सुरु झाला महागड्या कॉफीचा सिलसिला.