मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत संघाचा विजयदशमी उत्सव


नागपूर – आज (रविवार) नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडत असून यंदाच्या विजयादशमी सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नसल्यामुळे संघाच्या पारंपारिक दसरा सोहळ्यात यंदा खंड पडला आहे. हडगेवार सभागृहात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केल्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. हा सोहळा फक्त मोजक्याच ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेले नाही.

मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले की, पहिल्यांदाच विजयादशमीचा कार्यक्रम कमी लोकांच्या उपस्थित घेण्यात आला. संपूर्ण जगावर यंदा कोरोनाचे संकट आले आहे. संपूर्ण देश या संकटकाळात एक झाला. कोरोनासोबत सर्वांनी मिळून लढा दिला आहे. कोरोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असे नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल.

कलम ३७० २०१९ मध्ये हटवण्यात आले, त्याचबरोबर न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. हे निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारले. त्याचबरोबर देशातील कुठल्याही नागरिकाला सीएएचा धोका नसल्याचे भागवत म्हणाले. देशात सीएएविरोधी निदर्शने झाली. निषेध नोंदवण्यात आल्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर कोरोनावर संकट आल्याचे भागवत म्हणाले.