ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून मदत करावी; पंकजा मुंडेंची मागणी


सावरगाव – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटीची मदत पुरेशी नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी मदत करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात केली.

सावरगावातील भगवान गडावर दसऱ्यानिमित्त मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पंकजा पुढे यांनी पुढे सुरू ठेवली असून, पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन, ते गोपीनाथ मुंडे यांनी केले. साहेबांना कधी दिल्ली, तर कधी मुंबई दिसायची. पंकजा एका दसरा मेळाव्याला दिसली पण साहेब आपल्यात राहिले नसल्याची खंत पंकजा यांनी व्यक्त केली.

मागील अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, पंकजा घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. त्याचबरोबर अपप्रचार देखील सुरू होता. पण, कोरोना काय मी आणला का? कोरोनात जबाबदारीने वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, मी भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. भगवान गडावर जिवंत असेपर्यंत येत राहिन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे बेजार झाला आहे. सरकारकडे मी मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. १० हजार कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नसून शेतकऱ्यांचे नुकसान मोठे असल्यामुळे सरकारने आणखी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.