बोलण्यातील दोषाचे मूळ कारण


मुलां-मुलींच्या बोलण्यामध्ये आढळणारे दोष हा संशोधनाचा मोठा विषय आहे. मात्र या दोषाचे मूळ त्या मुला-मुलींच्या मेंदूमध्ये असते आणि मेंदूतल्या भाषेच्या केंद्रामध्ये काही कमतरता राहिली की, त्या मुलाला किंवा मुलीला स्पष्टपणे बोलता येत नाही. पण ही कमतरता नेमकी काय असते आणि ती का निर्माण होते यावर संशोधन करण्यात आले. तेव्हा असे आढळले की, मूल गर्भात असतानाच्या काळात आईच्या आहारामध्ये ‘ड’ जीवनसत्वाचा अभाव निर्माण झाला की, त्याचे परिणाम मुलांवर होतात. त्याच्या मेंदूमध्ये ही कमतरता राहून जाते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या संबंधात बरेच संशोधन केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, ज्या माता गरोदर अवस्थेत ‘ड’ जीवनसत्व प्राप्त करू शकतात त्या मातांची मुले भाषिकदृष्ट्या सक्षम असतात आणि ज्या मातांना ‘ड’ जीवनसत्व कमी मिळते त्यांची मुले याबाबतीत सक्षम नसतात. या निरीक्षणांती निघालेल्या निष्कर्षांची माहिती ऑस्ट्रेलियातील पेडियाट्रिक्स या मासिकात छापण्यात आली आहे.

यापूर्वी अशा प्रकारचे अनेक प्रयोग झालेले आहेत. मातेच्या गरोदरावस्थेत तिला ‘ड’ जीवनसत्व किंवा ड जीवनसत्वयुक्त आहार मिळाला नाही तर त्याचे परिणाम मुलांच्या शरीरावर विशेषत: हाडांच्या मजबुतीवर आणि शारीरिक वाढीवरही होतात, असे मागे आढळून आलेले होते. परंतु या अभावाचे मनावर आणि मेंदूवर काय परिणाम होतात याचा ङ्गारसा अभ्यास केला गेला नव्हता. दहा वर्षांपासून काही शास्त्रज्ञांच्या मनात अशी कल्पना आली आणि त्यांनी तसे प्रयोग केले. तेव्हा मुला-मुलींच्या भाषिक कौशल्यावर या ‘ड’ जीवनसत्वाचा परिणाम असतो असे त्यांना आढळले. या संबंधात करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये असेही आढळून आले की, गरोदर अवस्थेत ड जीवन सत्व कमी मिळणार्‍या मातांच्या पोटी जन्मणार्‍या मुलांच्या वर्तनामध्ये आणि त्यांच्या भावनिक वाढीमध्ये सुद्धा काही कमतरता राहिलेली असते. या दृष्टीने पाहणी करण्यासाठी अनेक गरोदर महिलांचे निरीक्षण करण्यात आले.

ते करताना अशा महिलांची चार गटात विभागणी करण्यात आली. ही विभागणी कमीत कमी ‘ड’ जीवनसत्व मिळणार्‍या महिला, सामान्य ‘ड’ जीवनसत्व मिळणार्‍या महिला, जरा जास्त ‘ड’ जीवनसत्व मिळणार्‍या महिला आणि अतिरिक्त ‘ड’ जीवनसत्व मिळणार्‍या महिला अशी करण्यात आली आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळांचे वर्तन, भावनिक प्रतिक्रिया आणि भाषिक कौशल्य यांचे २० वर्षे निरीक्षण करण्यात आले. एवढ्या प्रदीर्घ पाहणी नंतर ते एका निश्‍चित निष्कर्षाप्रत आलेले आहेत की, गरोदरावस्थेतील ‘ड’ जीवनसत्व पुरवठ्याचा मुलांच्या भाषिक कौशल्यावर निश्‍चित परिणाम असतो. त्यामुळे महिलांना गरोदर अवस्थेत अधिकाधिक ‘ड’ जीवनसत्व पुरवले गेले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment