धक्कादायक आरोप; काळ्या जादूच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी मला मारण्याचा केला प्रयत्न – मोदी


पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता खऱ्या अर्थाने रंगात येऊ लागला आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान, शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी धक्कादायक आरोप केले. तीन वर्षांपूर्वी आपल्याला लालूंनी काळ्या जादूच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सुशीलकुमार मोदी यांनी एक ट्विट केले असून, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, लालू यादव हे अंधश्रद्धाळू असून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्यांनी पांढरा कुर्ता घालण्याचे बंद केले. तर शंकर चरण त्रिपाठी या मांत्रिकाला राजदचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवले. याच विंध्याचल धाममध्ये (मिर्झापूर) मांत्रिकाने लालू प्रसाद यादव यांच्याकडून तांत्रिक पूजा करवून घेतली होती आणि मला मारण्यासाठी देखील त्यांनी तीन वर्षांपूर्वी तंत्र पूजा केली आहे.


जनतेवर लालू प्रसाद यादव यांचा विश्वास नसल्यामुळे ते तंत्र-मंत्राच्या पूजाअर्चा करीत असतात. ते प्राण्यांचे बळी आणि आत्म्यांची प्रार्थना करीत असतात. एवढ करुनही ते तुरुंगातून सुटू शकले नाहीत किंवा आपली सत्ता टिकवू शकले नाहीत. अजून १४ वर्षे ते तुरुंगात घालवू शकतात. तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या रांची येथील बंगल्यावर नवमीच्या दिवशी तीन बोकडांचा लालू प्रसाद यादव यांनी बळी दिल्याचा दावाही मोदी यांनी केला आहे.