प्रकाश आंबेडकरांचे ऊसतोडणी कामगारांना आवाहन; आणखी दहा दिवस नाक दाबून ठेवा


बीड : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज भगवान गडाच्या पायथ्याशी ऊस तोडणी कामगारांचा मेळावा आयोजित केला. यामध्ये उसतोडणी कामगारांची कारखानदारांना गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक म्हणून ओळखले जाते, कारखानदारांना ऊसतोडणी कामगारांची गरज आहे, हे लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 दिवस नाक दाबून ठेवण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.

सध्याच्या घडीला ऊसतोड कामगारांची मोठी अडचण होत आहे. शेतात तुम्हाला काम नाही मिळाले तर रोजगार हमी योजना आहे. एकदा का अर्ज केला की तीन दिवसांत सरकारला रोजगार द्यावाच लागतो. नाहीतर रोजगार भत्ता द्यावा लागतो. यामुळे गरज साखर कारखानदारांना आहे. तुम्हाला नाही, असे त्यांनी ऊसतोड कामगारांना सांगितले. तसेच सातारा, सांगली भागात उसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. तेथील लोकच कंटाळले आहेत. कारखानदारांनी आपल्यापैकी काही कामगारांना जबरदस्तीने उचलून नेले आहे. त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांची अवस्था काय झाली हे तुम्ही पाहिली असलेच. त्यांना रहायलाही जागा नसल्यामुळे यामुळे आणखी काही दिवस थांबा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

मशीन सहा इंच वरून ऊस कापते आणि जर खोडापासून कापला गेला तर साखर अधिक मळली जाते. यामुळे किती जरी मशीन आणायचा प्रयत्न कारखान्यांनी केला, तर तो यशस्वी होणार नाही. यामुळे कामगारांना कारखानदार कधीच सोडणार नसल्याचे आंबेडकर म्हणाले. तुम्हाला जर उचलून नेत असतील तर वाटेत दिसणाऱ्या पोलिसाला हाक मारा, हात दाखवा आणि त्यांना हे जबरदस्तीने नेत असल्याचे सांगा, असा सल्लाही त्यांनी दिला.