मुंबईतील शिवतीर्थवर शक्तीप्रदर्शन करण्याची पंकजा मुंडेंची इच्छा


बीड: मागील अनेक वर्षांची परंपरा भगवानगडावरील दसरा मेळाव्याला असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करून या मेळाव्याला मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा देतानाच येत्या काळात केवळ भगवानगडच नाही तर मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचे आहे. तिथे शक्तिप्रदर्शन करायचे असल्याची घोषणा यावेळी पंकजा यांनी केली. यावेळी ‘कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली’ अशा घोषणा उपस्थितांमधून देण्यात आल्या.

अनेक वर्षांचे ठाकरे आणि मुंडे परिवाराचे ऋणानुबंध आहेत. पंकजा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाऊ मानतात. भाजप सोडून राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर पंकजा यांना शिवसेनेने जुन्या ऋणानुबंधातून साद घातली होती. पंकजा यांना थेट पक्षप्रवेशाची शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर व मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऑफर दिली होती. त्यावर पंकजा यांनी आज कोणतेही भाष्य केले नाही. पण त्यांनी यावेळी काही सूचक वक्तव्ये केली.

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क (शिवतीर्थ) अशी ऐतिहासिक परंपरा आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंकजा यांनी या मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांपुढे शिवाजी पार्कवर शक्तिप्रदर्शनाची इच्छा त्यांनी ठेवली. मुंबईतील शिवाजी पार्क मला एकदा भरून दाखवायचे असल्याचे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर मी घर बदलणार नाही, जिथे आहे तिथेच राहणार आहे. मी पक्षाची आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. देशाच्या पातळीवर पक्षाचे काम करणार असल्याचे नमूद करत पंकजा यांनी पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.