टीकेची झोड उठूनही बिहारी जनतेला मोफत लस देण्याच्या आश्वासनावर निर्मला सीतारमण ठाम


नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यातील मोफत कोरोना लसीच्या आश्वासनानंतर भाजपने तोंडावर आपटूनही आपला हेका कायम ठेवला असून बिहारमधील सत्ता काबीज केल्यानंतर राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, हे आमचे आश्वासन पूर्णपणे योग्यच आहे. सत्तेवर आल्यावर कुठलाही पक्ष काय करणार आहे, याची घोषणा करू शकतो, असे स्पष्टीकरण देशाच्या अर्थमंत्री, भाजप नेत्या निर्मला सीतारामण यांनी दिले.

हा राज्याच्या आरोग्याचा विषय असल्यामुळे मोफत लसीचे बिहारी जनतेला दिलेले आश्वासन पूर्णपणे योग्यच आहे. यात गैर काहीच नसल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा जाहिरनामा त्यांनी गुरुवारी सादर केला. त्यात त्यांनी सत्तेत आल्यास बिहारीमधील जनतेला मोफत लस देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यावर विरोधकांसह देशभरातील जनतेने जोरदार टीका केली. राजकीय फायद्यासाठी भाजप कोरोना महामारीचा उपयोग करत असल्याचा आरोप मुख्य विरोधी पक्षांनी केला. सत्ताधारी भाजपवर याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. पण सीतारामण यांनी शनिवारी त्यानंतरही पत्रकारांशी बोलताना मोफत लसीच्या आश्वासनावर ठाम राहत स्पष्टीकरण दिले.