महाविकास आघाडी एकत्र लढणार मुंबई महापालिकेच्या निवडणुका


मुंबई – शिवसैनिकांच्या गर्दीशिवाय शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच यंदाचा दसरा मेळावा पार पडत आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हा पहिला दसरा मेळावा असल्यामुळे आजचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कोरोनाचे संकट नसते तर शिवतीर्थावर आज महापूर आला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना, आगामी महापालिका निवडणुकांवरही भाष्य केले.

महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकाही लढल्या जातील. शिवसेनेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केले. अनेकजणांनी 11 दिवसांत सरकार पडेल, गणपतीला या सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता बॉम्ब त्यांच्याच खाली फुटतील, असे म्हणत भाजपला इशारा दिला. विशेष म्हणजे महाविकास आघाडी महापालिका निवडणुकांमध्येही एकत्र असेल, असे भाकित राऊत यांनी वर्तवले आहे.