पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा


नवी दिल्ली – सध्या दैनंदिन व्यवहारांवर देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही याचा फटका बसत आहे. यंदाचा दसरा महोत्सव गर्दी आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम इतिहासात प्रथमच टाळून पार पडत असल्यामुळे, दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या सणालाही उत्साह दिसून येत नाही. दरम्यान देशवासियांना दसरा आणि महानवमीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन आता अनलॉकच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तर अद्यापही कोरोनाचे सावट असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस निघेपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर्स या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांना करावा लागणार आहे. देशात महानवमी म्हणजे खंडेनवमी आणि विजयादशमी दसरा त्याच पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा-आरती करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपल्या कार्यात सिद्धी प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.


तर दुसरीकडे देशवासियांना राष्ट्रपती रामनात कोविंद यांनीही दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे दसऱ्याचे हे पर्व प्रतिक आहे. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, महामारीच्या प्रभावापासून सर्वांच रक्षण करुन देशवासियांना समृद्धी आणि आनंदी करेल, असे कोविंद यांन आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.