व्यसनमुक्तीची नवी रीत


मद्यपान आणि धूम्रपान सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी निरनिराळ्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत. धूम्रपानाचे प्रमाण एवढे वाढत चालले आहे की, हे व्यसन करणार्‍यांना त्यातून मुक्त करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी उपचार पद्धती शोधावे लागत आहेत. भारतामध्ये काही शास्त्रज्ञांनी असे प्रयत्न केलेले आहेत आणि धूम्रपान करणार्‍यांपैकी पाच टक्के लोकांना त्यातून मुक्त करणे शक्य झाले आहे. धूम्रपान करणार्‍या व्यक्तीची एक विशिष्ट मन:स्थिती असते. सिगारेट किंवा बिडीमध्ये निकोटीन असते. सिगारेट ओढली की, रक्तातले निकोटीनचे प्रमाण वाढते आणि ते वाढले म्हणजे त्या व्यक्तीला समाधान वाटते. त्याच्या समाधाना एवढे प्रमाण वाढेपर्यंत तो सिगारेट ओढत राहतो. मात्र धूम्रपान करणार्‍या प्रत्येकाची मन:स्थिती अशीच असते असे काही सांगता येत नाही. बर्‍याच लोकांच्या धूम्रपानाचा रक्तातल्या निकोटीनच्या प्रमाणाशी थेट संबंध असतोच असे काही नाही. असे लोक केवळ चाळा म्हणून सिगारेट ओढत असतात.

बरेच लोक तर दुसर्‍यांचे अनुकरण करण्याच्या भावनेने धूम्रपान करत असतात. मात्र या निमित्ताने त्यांच्या रक्तात निकोटीनचे प्रमाण वाढते आणि निकोटीनचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. अशा लोकांना सिगारेट ओढण्याची लहर आली म्हणजे सिगारेटच्या ऐवजी दुसरा काही चाळा मिळाला तर त्याची सिगारेट सुटू शकते. म्हणजे अशा लोकांच्या बाबतीत सिगारेट सोडणे म्हणजे सिगारेटच्या ऐवजी दुसरा चाळा लावून घेणे होय. या तत्वाच्या आधारावर मुंबईतल्या काही डॉक्टरांनी एक नवी पद्धती शोधून काढली आहे. तिला निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी असे नाव दिलेले आहे.

मुंबईतल्या हिलीस सेखसरिया इन्स्टिट्यूट ङ्गॉर पब्लीक हेल्थ या संस्थेने याबाबतीत बरेच संशोधन केलेले आहे. या पद्धतीमध्ये सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीला निकोटीनमुक्त तंबाखू वापरून केलेली सिगारेट ओढायला दिली जाते. या धूम्रपानात सिगारेटमधील सर्व घटक असतात. ङ्गक्त त्यातले घातक ठरणारे निकोटीन नसते. म्हणजे त्याची सिगारेट ओढण्याची हौस तर भागते, पण या सिगारेटमध्ये निकोटीन नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम मात्र त्याला भोगावे लागत नाहीत. यामध्ये केवळ निकोटीन देणे असाही एक प्रयोग केला जातो. त्यामध्ये सिगारेट नसते, ङ्गक्त निकोटीन शरीरात जाते आणि हळू हळू सिगारेट ओढण्याचा चाळा कमी होत राहतो. म्हणजे या पद्धतीत धूम्रपानातील निकोटीन आणि सिगारेट यांची ङ्गारकत केली जाते. या प्रकाराने बारा आठवड्याच्या आत २४ टक्के धूम्रपींची सवय सुटते असा अनुभव आहे. या संस्थेचे प्रमुख डॉ. प्रकाश गुप्ता यांनी या थेरपीची माहिती दिली. भारतामध्ये सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी धूम्रपान सोडण्याविषयीच्या चांगल्या उपचाराची गरज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment