लालू यादव दुर्गापूजेसाठी देणार तीन बकरे बळी

बिहार विधानसभा निवडणुकामुळे तेथे राजकारण चांगलेच तापले असताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि चारा घोटाळ्यातील दोषी,माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी नवरात्रीत तीन बकरे बळी देण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील पाहिला बळी जदयु आणि भाजपा यांचा या निवडणुकीत पराभव व्हावा म्हणून, दुसरा बळी लालूपुत्र तेजस्वी यादव याला बिहारचे मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून तर तिसरा बळी लालूंना जामीन मंजूर होऊन तुरुंगातून बाहेर पडता यावे म्हणून दिला जाणार आहे.

लालू याना चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरविले गेले आहे त्यामुळे ते तुरुंगात आहेत. चारा घोटाळा प्रकरणात त्यांनी जामीन मिळावा म्हणून तीन याचिका दाखल केल्या आहेत. पैकी दोन न्यायालयांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे आणि तिसऱ्या न्यायालयात या संदर्भात ६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. जामीन मिळविताना लालूनी तब्येत बरी नसल्याचे तसेच निम्मा वेळ तुरुंगात अगोदरच घालविला असल्याचे म्हणणे मांडले आहे. लालू सध्या रिम्स मध्ये दाखल आहेत आणि तेथील बंगल्यात दुर्गा पूजा करून लालू बकरे बळी देणार आहेत.

या ठिकाणी लालूंची देखभाल करत असलेल्या इरफान अन्सारी यांनी बंगल्यावर दोन मोठे बकरे गुरुवारी पोहोचते केले असल्याचे समजते. तुरुंगात असताना पूजा पाठ करता येतात का असा सवाल विचारल्यावर तुरुंगात उत्सव, पूजापाठ करायची परवानगी असते असे उत्तर दिले गेले आहे.

Loading RSS Feed