यंदा अयोध्येत शरयूतीरी  उजळणार ५ लाख दिवे

राममंदिर बांधकामाची सुरवात झाल्यानंतरची पहिली दिवाळी अयोध्येत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदाच्या चौथ्या दीपोत्सवात शरयूच्या तीरावर ५ लाख दिवे उजळवून दीपोत्सव साजरा केला जाणार असून मुख्य कार्यक्रम १३ नोव्हेंबर ला होणार आहे. यावेळी कोविड १९ साठी लागू केलेल्या नियमावलीचे काटेखोर पालन केले जाणार आहे. गतवर्षी दीपोत्सवात साडेचार कोटी दीप प्रज्वलित केले गेले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सामील होणार आहेत.

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी काही ड्रीम प्रोजेक्ट निश्चित केले होते त्यात शरयूतीरी दीपोत्सवाचा समावेश होता. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली असून त्याला राजकीय मेळ्याचा दर्जा मिळाला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दीपोत्सवाच्या आदल्या दिवशी निघणारी शोभायात्रा हे आहे. रामकथा पार्क मध्ये राम राज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सर्व कार्यक्रमात नागरिकांना मास्क घालणे आणि अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार शरयू तीरावरील राम पौडीचा या वर्षी विस्तार झाला आहे त्यामुळे जास्त दिवे लावणे आणि योग्य अंतर ठेवणे शक्य होणार आहे.