मिलिटरी कॅंटीनमध्ये आता विदेशी मालावर बहिष्कार

नवी दिल्ली: देशभरातील मिलिटरी कँटीन्समध्ये विदेशी वस्तूंच्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आल्याचा दावा वृत्तसंस्थेने केला आहे. त्यामुळे यापुढे लष्कराच्या कॅंटीनमध्ये आता सवलतीच्या दरात विदेशी वस्तू खरेदी करण्याचा मार्ग बंद होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अंतर्गत पत्रकाद्वारे हे निर्बंध घालण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्थानिक उत्पादनांना चालना देण्याच्या धोरणाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

देशभरात लष्करी दलांची ४ हजार कँटीन्स आहेत. लष्करी दलांमधील अधिकारी, कर्मचारी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना त्याद्वारे सवलतीच्या दरात गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्यासह भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि आयात केलेल्याविदेशी मद्याचा समावेश आहे. या कँटीन्सची वार्षिक उलाढाल तब्बल १४ कोटी ७० लाख रुपयांची आहे. विदेशी वस्तूंची विक्री बंद केल्याने त्याचा परिणाम प्रामुख्याने अल्प दरात आयात मद्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्यांवर होणार आहे.

या कँटिन्समध्ये दरवर्षी होणाऱ्या एकूण विक्रीच्या ६ ते ७ टक्के एवढे प्रमाण आयात वस्तूंचे आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये सर्वाधिक प्रमाण चिनी बनावटीचे डायपर्स, लॅपटॉप, व्हॅक्युम क्लीनरसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पिशव्या यांचे आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चिनी वस्तूंच्या आयातीला चाप लावण्याच्या उद्देशानेही संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.