ढाका येथील शक्तीपीठ ढाकेश्वरी माता

फोटो साभार ट्रीप अॅॅडव्हायझर

नवरात्रीच्या काळात शक्तीपीठे असलेल्या ठिकाणी भाविक मोठी गर्दी करतात. सतीमातेची एकूण ५२ शक्तीपीठे आहेत. त्यातील बरीचशी भारतात आहेत तशीच काही पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही आहेत. बांग्लादेशाची राजधानी ढाका हे नाव मातेच्या ज्या शक्तीपीठावरून पडले त्या ढाकेश्वरी मातेच्या दर्शनासाठी या काळात सर्व धर्मीय भाविक मोठ्या भक्तीभावाने येत आहेत. या ठिकाणी माता सतीच्या मुकुटातील मौल्यवान रत्ने पडली होती असे मानले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे मंदिरासमोर एकाच ठिकाणी चार शिवमंदिरे आहेत. नवरात्रीत येथे फार मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला जातो. यंदा करोनामुळे मर्यादित संखेने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. येथे पर्व समाप्तीनंतर दुर्गेचे विसर्जन पाण्यात केले जात नाही तर आरसा दाखवून विसर्जन केले जाते.

१२ व्या शतकात सेन राजा बल्लारसेन याने या मंदिरचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहास सांगतो. हे मंदिर बंगाली वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात हे मंदिर अर्ध्यापेक्षा अधिक उध्वस्त झाले होते. २५ वर्षे त्याचा जीर्णोद्धार सुरु होता. १९९६ मध्ये हे काम पूर्ण झाले. स्थानिक व्यापारी या मातेला दागिने आणि महाग साड्या अर्पण करतात आणि त्यातूनच देवीचा शृंगार केला जातो असे समजते.