गोल्डमन विरोधात पत्नीची छळ केल्याची पोलीस तक्रार

पिंपरी चिंचवड मध्ये गोल्डमन नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि एक किलो पेक्षा अधिक सोने अंगावर घालून मिरविणाऱ्या सनी नाना वाघचौरे याच्या विरोधात त्यांच्या पत्नीने शारीरिक छळ, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याची तक्रार शुक्रवारी नेहरूनगर पोलीस चौकीत दाखल केली आहे. या तक्रारीत तिने सासू आशा, सासरे नाना आणि नणंद नीता गायकवाड यांच्यावर सुद्धा छळ केल्याचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीनुसार या चौघांनी २३ मार्च २०११ पासून ऑक्टोबर २०२० असा दीर्घ काळ तिचा छळ केला आहे.

तक्रारीत केलेल्या आरोपानुसार सनीच्या पत्नीचा सातत्याने छळ केला जात असून तिला गर्भपात करण्याची जबरदस्ती केली गेली. सतत मारहाण, माहेराहून पैसे आणावेत म्हणून छळ केला गेला व अनेकवेळा चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली गेली.

सनी वाघचौरे याला लहानपणापासून सोन्याचे वेड आहे. तो सदोदित गळ्यात अनेक सोन्याच्या साखळ्या, हातात ब्रेसलेट, सोन्याचे कडे घालून फिरतो. त्याच्याकडे गोल्डन कलरची ऑडी कार, सोन्याचे पॉलिश  केलेला आयफोन आणि सोनेरी बूट आहेत. या सोन्याच्या संरक्षणासाठी तो दोन बॉडीगार्ड सोबत ठेवतो. या भागातील नागरिक सनीची कमाई काय यावरून सतत चर्चा आणि त्याच्या वागण्यावर टीका करतात असेही बोलले जात आहे.