देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे


मुंबई: केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात आम्ही ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा वाचली होती. त्याच प्रमाणे भाजप आता ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे. संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला खडे बोल सुनावले. जातीधर्माच्या मुद्द्यावरून यापूर्वी देशात दुही माजवण्याचा प्रयत्न झाला. भाजपकडून लसीच्या मुद्द्यावरून आता देशाचे विभाजन करण्याची तयारी सुरु आहे का, असे राऊत यांनी विचारले.

मत न देणाऱ्यांना भाजप कोरोनाची लस देणार नाही, अशाप्रकारचे राजकारण क्रुरता आहे. भाजप नेत्यांकडून मध्य प्रदेशातही अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत मिळणार किंवा नाही, हे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट करावे, असेही राऊत यांनी म्हटले.