रावसाहेब दानवेंचा एकनाथ खडसेंच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात गौप्यस्फोट


मुंबई – राष्ट्रवादीत एकनाथ खडसे गेल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही, एकही आमदार, पदाधिकारी नाथाभाऊसोबत जाणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केला आहे. त्याचबरोबर राज्याच्या भल्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर करावा, विरोधकांसाठी करू नये, असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसला दानवेंनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत लगावला आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पद एकनाथ खडसेंना देऊनही त्यांनी नाकारल्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. जर प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे झाले असते तर कदाचित खडसे त्यावेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मंत्रिपदात खडसेंना जास्त रस होता. परिस्थिती सुधारणार नसल्याचे वाटत असल्याने खडसेंनी राजीनामा दिला असावा. नाथाभाऊ आमचे नेते होते, त्यांनी पक्ष सोडला दु:ख आहे. परंतु एका माणसावर पक्ष आधारित नसतो, कार्यकर्ते गावागावात आहेत, नाथाभाऊसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही याची खात्री आहे. कारण ते विचारधारेशी जोडलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. म्हणून चिंता नाही, एकनाथ खडसे हा विषय आता भाजपसाठी संपलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच नाथाभाऊच्या फार्महाऊसवर, घरी मी गेलो, सरकारी बंगल्यावर गेलो होतो, मी समजावले नाही पण राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. जे चालले आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हिना गावित, सुभाष भामरे, रक्षा खडसे असे अनेक नेते आहेत. राष्ट्रवादीला भाजपने २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवले असल्यामुळे खडसेंना प्रवेश देऊन हे नुकसान भरुन काढता येणार आहे का? राष्ट्रवादीने यासाठी प्रयत्न केला, पण एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, राज्याच्या भल्यासाठी नाथाभाऊंचा उपयोग करावा, विरोधकांसाठी नव्हे असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.