राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वासमोर खडसेंच्या पुनर्वसनाचे आव्हान


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर आता पक्ष नेतृत्वासमोर खडसेंच्या पुनर्वसनाचे आव्हान आहे. राष्ट्रवादीत योग्य सन्मान एकनाथ खडसेंचा राखण्यासाठी मंत्रिपद त्यांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा आहे.

कृषिमंत्री पद एकनाथ खडसेंना देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, पण कृषी खाते सोडण्यास शिवसेना उत्सुक नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता खडसेंच्या पुनर्वसनाचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर असणार आहे. कृषी खाते सोडण्यास शिवसेना तयार नसल्यामुळे एकनाथ खडसेंना गृहनिर्माण खाते दिले जाईल अशी चर्चा आहे. पण गृहनिर्माण खाते सोडण्यास जितेंद्र आव्हाड अनुकूल नाहीत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर हे नेते खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

एकनाथ खडसे यांना सध्याच्या घडीला मंत्रिपद देणे शक्य नसले तर एकनाथ खडसेंना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद दिले जाऊ शकते, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना नियोजन मंडळाचे पद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.