खडसेंनी आधी स्वतः केलेल्या उद्योगांचा विचार करावा, प्रसाद लाड यांची टीका


मुंबई – भाजपवर आरोप करताना एकनाथ खडसेंनी स्वतः काय उद्योग केले होते, त्याचा विचार करावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसेंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील, तर त्याला आपण आळा घालू शकत नसल्याचेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

कुणावरही आरोप करणे सोपे असते पण ते सिद्ध करणे कठीण असते. एकनाथ खडसेंचा फक्त भाजप किंवा पक्षातील नेतृत्त्वावर आरोप करण्यासाठी वापर होऊ नये. राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा असाही टोला प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. राष्ट्रवादीत खडसेंना एकाधिकारशाही काय असते ते देखील चांगले कळेल, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसेंना मंत्रिपद मिळावे, त्यांना राष्ट्रवादीने पक्षात फक्त भाजपवर आरोप करण्यासाठी घेतले असे होऊ नये, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आपण स्वतः काय उद्योग केले आहेत, त्याचाही विचार करावा असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.