भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका


नवी दिल्ली – भारतीय संघाला १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असून सध्या दिल्लीतील रुग्णालयात कपिल देव यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या तब्येतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार फोर्टीस रुग्णालयात कपिल देव यांच्यावर उपचार सुरु आहेत. कपिल देव साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात मध्यरात्री १ वाजता छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली.

अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये ६१ वर्षीय कपिल देव समालोचनही करत असतात. कपिल देव यांनी आपल्या १६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आपल्या काळातले सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख असलेल्या कपिल देव यांचा भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा उचलला होता.