हवामान बदलावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतसह चीन, रशियावर साधला निशाणा


वॉशिंग्टन – सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीकडे लागले असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे सध्या आमने सामने आहेत. आज दोन्ही उमेदवारांमधील अध्यक्षीय निवडणुकीतील चर्चेची शेवटची फेरी झाली. भारताविषयी एरवी गोडवे गाणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या फेरीत हवामान बदलावरून टीका केली आहे.

शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी संपली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या फेरीत हवामान बदलाच्या मुद्यावर भूमिका मांडताना भारतासह चीन, रशियावर टीका केली. हवामान बदलाच्या दिशेनं भारताकडून केल्या जाणाऱ्या कामावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारत, चीन आणि रशियाचे हवामान बदलाच्या लढाईत काम चांगले नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, गेल्या ३५ वर्षात अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारतात ट्र्म्प यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे.