सॅमसंगचे तीन फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच येणार

दक्षिण कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगने तीन नव्या फोल्डेबल स्मार्टफोन साठी दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली असल्याचे समजते. हे तिन्ही फोल्डेबल स्मार्टफोन वेगळ्या डिझाईनचे असतील व त्यात इनर कॅमेऱ्यासाठी कटआउट मिळतील असे सांगितले जात आहे. मीडियाच्या माहितीनुसार सॅमसंगच्या या तिन्ही स्मार्टफोनसाठी दाखल केलेल्या पेटंटला १५ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली गेली आहे.

यातील दोन स्मार्टफोन आउटवर्ड फोल्डिंग स्क्रीनचे असतील तर एक इनवर्ड फोल्डिंग स्क्रीनचा असेल. कंपनीने आणखीही एक पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला असून या फोनमध्ये युजरला गरजेनुसार कमी जास्त करता येणारा स्क्रीन असलेला फोन मिळेल. दरम्यान सॅमसंगच्या आगामी एस २१ ए व एस २१ अल्ट्राची डिझाईन लिक झाली आहेत. यात हे फोन एस २० प्रमाणे दिसत आहेत. एस २१ स्मार्टफोन जानेवारी २०२१ मध्ये बाजारात येतील असे संकेत दिले गेले आहेत.