लॉकडाऊन नंतरच्या तिमाहीत स्मार्टफोनची रेकॉर्ड विक्री

फोटो साभार गिझबॉट

लॉकडाऊन नंतरच्या तिमाहीत भारतीय बाजारात स्मार्टफोनच्या विक्रीत ८ टक्के तेजी दिसून आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतीय बाजारात रेकॉर्ड ५ कोटी स्मार्टफोन विकले गेल्याचा अहवाल रिसर्च फर्म कॅनालीसने दिला आहे. कोणत्याची तिमाहीपेक्षा विक्रीचा हा आकडा अधिक असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. २०१९ मध्ये याच तिमाहीत ४.६२ कोटी स्मार्टफोन भारतात विकले गेले होते.

भारत चीन संघर्षांनंतर देशात चीनी मालावर बहिष्कार घातल्याचे दिसून येत असले तरी वरील फोन विक्रीत चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी हीच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सॅमसंग, विवो, रियलमी आणि ओप्पो यांच्या स्मार्टफोन विक्रीत वाढ झाल्याचे दिसत आहे. आता सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने स्मार्टफोन विक्रीत आणखी वाढ पाहायला मिळेल असे सांगितले जात आहे. ई कॉमर्स कंपन्याच्या फेस्टीव्ह सिझन मध्ये आत्तापर्यंत १.१० कोटी स्मार्टफोन विकले गेले आहेत.

चीनी शाओमीचा विचार केला तर या कंपनीचा भारतीय बाजारातील हिस्सा गतवर्षी ७४ टक्के होता तो यंदा ७६ टक्क्यांवर गेला असल्याचे दिसत आहे. मात्र तिमाही विक्रीचा आधार पाहिला तर चीनी मालावर बहिष्कार घालण्याची सुरवात झाल्यावर शाओमीची विक्री १४ टक्क्याने घटल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जून तिमाहीत शाओमीचा बाजारातील हिस्सा ८० टक्के होता.