अमेरिकेची गुपिते चव्हाट्यावर आणणाऱ्या स्नोडेनला रशियाचे नागरिकत्व

फोटो साभार जागरण

अमेरिकेतील गुप्तचर संस्थांची अनेक गुपिते चव्हाट्यावर आणून अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या नाकात दम आणणारा व्हिसल ब्लोअर एडवर्ड स्नोडेन याला रशियन सरकारने कायम रहिवासी परवाना दिला असून इच्छा असेल तर स्नोडेनला रशियन नागरिकत्व मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेत काम करत असताना २०१३ मध्ये स्नोडेन याने अनेक महत्वाच्या गुप्त फाईल्स लिक करून अमेरिका जगातील अनेक देशांवर कशी पाळत ठेऊन आहे याचे पुरावे दिले होते. त्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने स्नोडेन ने अमेरिकेतून पलायन करून रशियात आश्रय घेतला होता. स्नोडेनने अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा संस्था स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी हेरगिरी करते आहे या संदर्भातली कागदपत्रे लिक करून ही माहिती सार्वजनिक केली होती.

रशियात गेल्यावर अमेरिकन अधिकारी स्नोडेन याने अमेरिकेत परत येऊन न्यायालयीन कारवाईस सामोरे जावे आणि न्यायालय देईल ती शिक्षा भोगावी यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान स्नोडेन याने रशियात कायम रहिवासी दाखला मिळावा यासठी अर्ज केला होता. पण करोनामुळे त्यावरचा निर्णय लांबला होता. अखेर गुरुवारी त्याला कायम रहिवासी दाखला दिला गेल्याचे त्याचे वकिलाने स्पष्ट केले.

दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट मध्ये स्नोडेनला माफी देण्याबाबत विचार सुरु असल्याची घोषणा केली होती. न्युयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही घोषणा केली होती. स्नोडेनने उघडकीस आणलेल्या माहितीमुळे अमेरिकन गुप्तहेर क्षेत्रात खळबळ माजली होती आणि त्यांनी स्नोडेन ला फरारी घोषित केले होते.