सर्वाधिक वेगवान कारचा ताज एसएससी तुताराच्या माथी

अमेरिकन ऑटोमेकर शेल्बे सुपरकार्सच्या एसएससी तुतारो (SSC TUATARA)ने कोनिंगसेग अगेरा रेसिंग कारला मागे सारून जगातील सर्वाधिक वेगवान कारचा ताज मिळविला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लास वेगास मध्ये तुताराने ताशी ५३२.९३ किमीच्या वेगाने दौड मारली. २०१७ मध्ये कोनिंगसेग अगेराने ताशी ४४७.२३ किमीचा वेग गाठला होता आणि जगातील सर्वाधिक वेगवान कारचा खिताब मिळविला होता.

रेसिंग कार्स बाबत जगभरात वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे सतत सर्वाधिक वेगवान कार कोणती ठरली याची उत्सुकता जगभरात अनेक कारशौकिनांना असते. तुताराने १० ऑक्टोबर रोजी ११.२६ किमी ट्रॅकवर हे नवे रेकॉर्ड नोंदविले. पहिल्या रेकॉर्डमध्ये ती ४८४.५३ किमी वेगाने धावली तर दुसऱ्या रेकॉर्ड मध्ये तिने ताशी ५३२.९३ किमी.चा वेग गाठला. तिचा सरासरी वेग ताशी ५०८.७३ किमी भरला. रेसिंग ड्रायव्हर ऑलिव्हर वेब याच्याकडे तुताराचे चालकत्व होते. त्याच्या म्हणण्यानुसार तुतारा याहूनही अधिक वेगाने धावू शकेल.

तुताराचे पूर्ण रेकॉर्डिंग गिनीज बुक टीम समोर झाले. तिचा स्पीड मोजण्यासाठी विशेष जीपीएस व १५ उपग्रहांचा वापर केला गेला. या कारची किंमत १.६ दशलक्ष डॉलर्स असून तिची १०० युनिट बनविली जाणार आहेत.