युवकात हृद्ररोग वाढतोय्

गरीब देशात हृदयविकार कमी असतो आणि तो प्रगत देशात जास्त असतो, अशी आपली साधारण कल्पना खोटी ठरवत भारतामध्ये हृद्रोग्याचे प्रमाण वाढत आहे. आता ही गोष्ट काही नवी राहिलेली नाही. भारतात हृद्रोगी खूप आहेत, एवढेच नव्हे तर भारत ही हृदयविकाराची जागतिक राजधानी आहे असे सर्वांना माहीत झाले आहे. परंतु हृद्रोग दिनानिमित्त पुढे आलेली माहिती ङ्गारच चिंताजनक आहे. भारतात हृद्रोग्यांची संख्या केवळ जास्तच आहे असे नव्हे तर भारतातल्या हृद्रोग्यामध्ये २५ टक्के लोक ४० वर्षांच्या आतील आहेत. म्हणजे भारतातल्या तरुणांना हृदयविकाराने त्रस्त करायला सुरुवात केली आहे.

भारतात लोकांचे जीवन वरचेवर धकाधकीचे, दगदगीचे होत आहे हे तर वाढत्या हृद्रोगाचे प्रमुख कारण आहेच, परंतु आहारातील बदल आणि व्यसनाधीनता ही दोन मुख्य कारणे आहेत, असे हृद्रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या गोष्टीवर आता मात कशी करावी या दृष्टीने तज्ज्ञ मंडळी विचार करायला लागली आहेत. त्यांनी या संबंधात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगायला सुरुवात केली आहे. ४० वर्षाच्या आतील लोक हृद्रोगाला बळी पडत आहेतच, पण लहान मुलांमध्ये सुद्धा या विकाराची शक्यता दिसायला लागली आहे. म्हणून जनजागृतीची ही चळवळ चालवताना लहान मुलांना सुद्धा खाण्यापिण्याच्या सवयी, व्यसने, व्यायाम, खेळ यांच्या संबंधात काही तरी सांगण्याची गरज आहे.

भारतात दरवर्षी ६० ते ९० हजार लहान मुले हृदयविकाराशी संबंधित आजारांना बळी पडतात असे दिसून आले आहे. एका जागी बसून राहणे, व्यायाम न करणे, वजन वाढवणारे अन्न खाणे आणि धूम्रपान ही हृदयविकाराची काही कारणे आहेत. त्यामुळे या कारणांच्या बाबतीत लहान मुलांना संस्कारक्षम वयातच सावध केले पाहिजे. भारतीय लोक हृद्रोगप्रवण आहेत. याचा अर्थ कोणाही भारतीयाला कोणत्याही क्षणी हृद्रोग होण्याची शक्यता असते आणि पाश्‍चात्य देशातील समान वयाच्या लोकांशी तुलना केली असता भारतीयांना हृद्रोग होण्याची शक्यता त्यांच्यापेक्षा चौपट जास्त असते, अशी माहिती चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रताप सी. रेड्डी यांनी दिली आहे. भारतीयांची बदलती जीवन पद्धती वेगाने आणि झपाट्याने बदलत आहे. त्याचा हा परिणाम होय, असे रेड्डी म्हणाले. कोणाही भारतीयाला कोणत्याही क्षणी हृद्रोग होण्याची शक्यता असेल तर त्यांनी अधूनमधून आपला कार्डिओग्राम काढून घेतला पाहिजे, तरच हृदय विकार होण्याच्या आतच त्याचा बंदोबस्त करता येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment