पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे फेक फेसबुक अकौंट उघडकीस
फोटो साभार भास्कर
पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकौंट बनवून त्यावरून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आल्याबरोबर आयुक्तांनी नागरिकांना त्याबाबत सावधानतेचा इशारा दिला असून या अकौंटवरून कुणालाही पैसे मागितले गेले तर त्याची खबर त्वरित जवळच्या पोलीस चौकीत द्यावी असे आवाहन केले आहे. या प्रकाराचा तपास करण्यासाठी सायबर गुन्हे शाखेतील एका टीमची नेमणूक केली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकौंट उघडून त्यावरून एका नागरीकाकडे १० हजार रुपयांची मागणी केली गेली. हा प्रकार उघडकीस येताच आयुक्तानी त्वरित या अकौंटपासून नागरिकांनी दूर राहावे असे आवाहन केले व तपास सायबर गुन्हे विभागाला दिला. कृष्णप्रकाश सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह आहेत. कमीत कमी वेळात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे सोशल मिडिया महत्वाचे माध्यम आहे यामुळे अनेक बडे अधिकरी, राजकीय नेते, सेलेब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.
कृष्णप्रकाश यांच्या फेक फेसबुक अकौंट संदर्भात फेसबुकशी संपर्क साधला गेला असून या फेक अकौंटचे सर्व डीटेल्स मागविले गेले आहेत असे समजते.