घरकाम आणि तणाव

घरकाम करणे हे बायकांचेच काम असते, असा समज आहेच. तेव्हा एखादा पुरुष घरकाम करायला लागला तर त्याला बायका सुद्धा हसतात. मात्र आता बायकांनी नोकरी करून कमाई करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे ओघानेच त्यांच्या घरकामाचा काही भार पुरुषांनीही उचलावा ही अपेक्षा व्यक्त होत आहे आणि पुरुषांच्याही ती लक्षात यायला लागली आहे. बरेच पुरुष जमेल तेवढे घरकाम करून आपल्या बायकांचा भार हलका करत आहेत. त्यामुळे केवळ बायकांचाच भार कमी होतो असे नाही तर त्याचा ङ्गायदा पुरुषांना सुद्धा होतो, असे काही संंशोधकांना आढळले आहे. जे पुरुष बायकांना घरकामात मदत करतात त्यांचा मानसिक ताण कमी होतो असे स्विडनमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळले आहे. जे पुरुष घरकामाच्या बाबतीत कामचुकारपणा करतात त्यांना अधिरता आणि हृदयाची धडधड अशा मानसिक प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. अशा पुरुषांच्या बायकांवर घरकाम आणि ऑङ्गिस काम या दोन्ही कामांचा बोजा पडतो आणि त्यांची प्रकृती खराब होते.

त्यांना कसले मानसिक त्रास होत नाहीत, पण शारीरिक त्रास मात्र होतात. याचा अर्थ असा की, पुरुषांनी बायकांच्या घरकामाचा भार हलका केला तर बायको आणि नवरा अशा दोघांचीही तब्येत छान राहते आणि ज्या घरात नवरे असा बायकोचा भार कमी करत नाहीत त्या घरात दोघांचीही प्रकृती बिघडलेली असते. स्विडनच्या उमिया विद्यापीठामध्ये या संबंधात काही संशोधन करण्यात आलेले आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे तर सार्‍या जगातच घरकामाचा मक्ता बायकांनाच दिलेला आहे. त्यामुळे बाई नोकरी करणारी असो की नसो घरकाम तीच करते. स्विडनमध्येही तीच अवस्था आहे. परंतु तिचे परिणाम काय होतात याचा कोणीच अभ्यास केला नव्हता. लीसा हॅरिसन या प्राध्यापिकेने हा अभ्यास केला आणि तिला हे निष्कर्ष मिळाले. तिने समस्त पुरुष वर्गाला घरकामात मदत करण्याचा सल्ला दिलेला आहे. परंतु हा सल्ला मानून लोक केवळ घरकामाचे नाटक करतील तर त्याचा काही ङ्गायदा व्हायचा नाही.

पुरुषांनी घरकामाचा निम्मा बोजा उचलला पाहिजे, असा तिचा सल्ला आहे. एवढेच नव्हे तर घरातली कोणती कामे कोणी करावीत यावर पती-पत्नींची चर्चा केली पाहिजे, असे तिचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये महिलांच्या संबंधात काही निष्कर्ष हाती आले आहेत. या अभ्यासानुसार ज्या महिला निव्वळ गृहिणी म्हणून काम करतात त्या महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जास्त असते तर ज्या महिला नोकरी करतात त्यांच्या मध्ये हे प्रमाण कमी असते. एकंदरीत असे म्हणता येईल की, बायकांच्या नावाने राखीव असलेल्या कामात पुरुषांनी सहकार्य केले तर पुरुषांची प्रकृती छान राहते आणि पुरुषांसाठी राखीव असलेल्या कामात महिलांनी सहकार्य केले तर महिलांची तब्येत छान राहते. यासाठी पुरुषांच्या आणि महिलांच्या कामांचे हे आरक्षणच रद्द केले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment