उंच व्यक्तींचा बुद्धय़ांक जास्त?

लंडन – कमी उंचीच्या व्यक्तीचा बुद्धय़ांक कमी तर उंच व्यक्तीचा बुद्धय़ांक अधिक असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. याबाबत एडिनबर्ग विद्यापीठाने व्यापक संशोधन केले. या संशोधकांनी उंची व बुद्धय़ांकाचा परस्पर समन्वय संबंध दाखवणारी गुणसूत्रे शोधून काढली आहेत. यामुळे या विषयाचे गूढ उलगडण्यास मदत मिळणार आहे. ज्या व्यक्तींची उंची कमी असते त्यांचा बुद्धय़ांकही सरासरी कमी असतो. तर उंच व्यक्तींचा बुद्धय़ांक अधिक असतो, असे वृत्त ‘द स्कॉटस्मॅन’ने दिले आहे. स्कॉटलंड येथील हजारो कुटुंबीयांचा पाच वर्षाचा अभ्यास संशोधकांनी केला. त्यानंतर हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. भाषा क्षमता, प्रतिक्रिया देण्यास लागणारा वेळ आणि स्मरणशक्ती आदी बाबींचा विचार करण्यात आला. २००६ ते २०११ या काळात ६८००हून अधिक जणांचा ‘डीएनए’ मार्करचा अभ्यास केला, असे एबरडीन विद्यापीठ आणि युनिव्‍‌र्हसिटी कॉलेज लंडनने सांगितले. उंची व गुणसूत्राचा परिणाम ७० टक्के असल्याचे आढळले. बुद्धय़ांकाचा परिणाम व्यक्तीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतो. तर पर्यावरणाचा परिणाम ३० टक्के असतो. बुद्धय़ांक आणि उंचीवर अवलंबून असलेल्या गुणसूत्रानुसार व्यक्तीच्या आरोग्यावर होणारा परिणाम जाणवू शकतो, असे एडिनबर्ग विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ जेनेटिक्स अ‍ॅँड मॉलिक्युलर मेडिसीनचे रिकाडरे मारिओनी यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून उंची व बुद्धय़ांकाचा संबंध अनेक वर्षापासून शास्त्रज्ञ लावत आहेत. मात्र त्याची कारणे अजूनही उघड झालेली नाहीत. हे संशोधन ‘बिहेव्हिअरल जेनेटिक्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment